महाराष्ट्र
महावितरणचा गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे मंजूर ट्रान्सफॉर्मर झाले मिस्टर इंडिया
श्रीगोंदा प्रतिनिधी : महावितरणच्या अधिकार्यांनी तालुक्यातील एच. व्ही. डी. एस. योजने अंतर्गत मंजूर असलेले ट्रान्सफार्मर त्याच शेतकर्यांना न बसवता पैसे घेऊन दुसरीकडे बसविण्यात आल्याने अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. मंडळ कार्यालय अहमदनगरचे कार्यकारी अभियंता काकडे यांना निवेदनाद्वारे अशा शेतकऱ्यांना न्याय देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिरडगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील आप्पा गेणा मोरे यांनी १८ जुन २०१३ रोजी महावितरणच्या एच. व्ही. डी. एस. योजने अंतर्गत ८८०० रूपये कोटेशन भरले होते. या शेतकऱ्यांनी आजपर्यंत अनेक हेलपाटे मारून सुद्धा महावितरण कंपनीने ट्रान्सफार्मर बसवला नाही. परंतु ऑनलाइन तपासणी केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या नावाने ट्रान्सफार्मर मंजूर असुन तो दुसरीकडे बसवला असल्याचे निदर्शनास आले. तसेच या शेतकऱ्यांच्या नावाने विज बिल सुद्धा ऑनलाइन दिसल्यावर या शेतकर्यानी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांना हकीकत सांगितली व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकारी अभियंता काकडे यांना त्या शेतकर्याला १५ दिवसात ट्रान्सफार्मर बसवून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, महेश बावदनकर, नवनाथ मोरे आदींच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास १५ नोव्हेंबर २०२१ रोजी श्रीगोंदा कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.