छत्रपती संभाजीनगर

दावरवाडी मध्ये शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 
मयत आप्पासाहेब सातपुते

विजय चिडे/ पाचोड : पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील एका ४४ वर्षीय शेतकऱ्यांने दोरीच्या सहाय्याने स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दि. १५ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. आप्पासाहेब भानुदास सातपुते (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

या विषयी अधिक माहीती अशी की, दावरवाडी शिवारात गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामूळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी आप्पासाहेब भानुदास सातपुते यांच्या शेतातील पिक या  अतिवृष्टीमुळे वाया गेले. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे त्यांच बरोबर कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करावा या विवंचनेतून गावातील खळवाडी भागातील स्वतःच्या शेतात गट नबंर ४३५ मधील चिंचाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी घरातील सदस्यांनी बघितले असता आप्पासाहेब सातपुते हे झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने आरडाओरडा करत गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना खाली घेऊन पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यास डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित करून उत्तणीय तपासणी केली. या घटनेची माहिती मिळताच सपोनि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुधाकर मोहीते, पवन चव्हाण व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,आप्पासाहेब हा कुटुंबातील सर्वात मोठा होता.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button