कृषी
हवामान बदलाच्या अनुशंगाने कृषि क्षेत्राला शाश्वत करण्यासाठी अनुकूल धोरणांच्या उपाययोजनांची गरज : कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाचा परिणाम देशातच नव्हे तर सर्व जगभर जाणवत आहे. हवामान बदलाच्या प्रादुर्भावामुळे पावसाची अनिमीयतता, घटते जंगलक्षेत्र, जंगलांना लागणार्या आगी, समुद्राच्या पाणी पातळीतली वाढ या सर्व कारणांमुळे कृषि क्षेत्र सर्वात जास्त बाधीत झाले आहे. भविष्यात कृषि क्षेत्राला हवामान बदलाच्या अनिष्ठ परिणामांपासून वाचवायचे असेल तर राज्य तसेच देश पातळीवरील सरकारी संस्था, खाजगी संस्था तसेच संशोधक या सर्वांनी एकत्र येवून योग्य उपाय योजनांसह अनकुल धोरणे तयार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने हवामान स्मार्ट शेतीसाठी धोरणे, संस्था व विपणन या विषयावर तीन आठवड्यांचा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, प्रकल्पाचे प्रमुख संशोधक व निमंत्रक डॉ. सुनिल गोरंटीवार, नवी दिल्ली येथील मका संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकरलाल जाट, सहनिमंत्रक डॉ. मुकुंद शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. फरांदे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की हवामान बदलावर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रासाठी महत्वाचा ठरणार आहे. हरितक्रांतीमुळे आपला देश अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णच नव्हे तर इतर देशांना पुरवठा करण्यामध्ये वरच्या क्रमांकावर आहे. आजचा शेती करणारा तरुण शेतकरी पदवीधारक असुन शेतीमधून मिळणार्या अनिश्चित मोबदल्यामुळे संकटात आहे. यासाठी शेतमाल विक्रीचे योग्य विपणन व त्यासाठीची योग्य धोरणे तयार करणे गरजेचे आहे. यावेळी डॉ. मिलिंद अहिरे यांनी प्रास्ताविक केले व या प्रमाणपत्र अभ्यास कामासंदर्भात माहिती दिली, डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी कास्ट-कासम प्रकल्पाची माहिती दिली व या प्रकल्पाद्वारे घेण्यात येणारे ऑनलाईन कार्यक्रम, प्रशिक्षणा संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.