कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठात मृद विज्ञानच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे शाश्वत शेती व अन्य सुरक्षा यासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ यांच्यामार्फत दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा दि. 9 ते 10 जानेवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी परभणी येथील मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. ए वेलमुरुगन, पुणे येथील नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक डॉ. रश्मी दरड, बारामती येथील राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी, नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन नियोजनाचे संचालक डॉ. एन.जी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये मृदा व्यवस्थापन, माती व पाणी संवर्धन, जमिनीतील जैवविविधता, डिजिटल सॉईल सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा मृदविज्ञानामध्ये वापर करणे, सेंद्रिय शेती, काटेकोर शेती, क्षारयुक्त जमिनींचे व्यवस्थापन, मृद सर्वेक्षण व भूमि नियोजन व माती मृदव्यवस्थापना संदर्भातील धोरणात्मक निर्णय या विषयावर झालेले संशोधन याविषयीचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये एकूण पाच सत्रामध्ये कामकाज पार पडणार आहे. या कार्यशाळेचे आयोजन भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली, शाखा-राहुरी येथील मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या मार्फत करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी नाबार्ड, पुणे यांचे अर्थसहाय्य लाभले आहे. या कार्यशाळेसाठी राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमधील 350 शास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच उद्योजक व शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button