जो सर्वसामान्य जनतेचे काम करेल, तोच राजकारणात टिकेल – देवेंद्र लांबे

राहुरी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राहुरी येथे शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेतृत्व करताना देवेंद्र लांबे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व शिवसेनेचा कार्यभावनेवर भर दिला. त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितले की, “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा बाळासाहेबांचा संदेश प्रत्येक शिवसैनिकाने आचरणात आणावा. समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देणे हेच आपल्या कामाचे ध्येय असले पाहिजे. जो सामान्य जनतेचे काम प्रामाणिकपणे करतो, तोच राजकारणात यशस्वी ठरतो.”
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये अशोक तनपुरे, रोहित नालकर, विजय पटारे, नारायण धोंगडे, महेंद्र शेळके, संतोष लांबे, दीपक तिडके, अविनाश क्षीरसागर, संकेत शेलार, गोरख दौडे आदींचा समावेश होता.
लांबे यांनी पुढे बोलताना सांगितले की, शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील शिवसेनेचे संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकाने कामाला लागावे. या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या सर्वसामान्य उमेदवारांना काम करण्याची मोठी संधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.