ठळक बातम्या
लम्पी स्कीन या आजाराचा वाढता प्रकोप लक्षात घेता तातडीने जनावरांचे लसीकरण करा – क्रांतीसेना
कळंब : उस्मानाबाद जिल्ह्यात लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या वाढत्या प्रकोपामुळे पशुधनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तातडीने जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अमोलआण्णा शेळके यांनी कळंब तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या पशुधनावर लम्पी स्कीन डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आत्तापर्यंत या रोगामुळे संपूर्ण देशभरात लाखो जनावरांना जीव गमावावा लागला आहे. यातच आता उस्मानाबाद व शेजारच्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांच्या पशुधनावर प्रादुर्भाव आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लवकरात लवकर तातडीने उपाययोजना कराव्या तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील काही ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
लम्पी स्कीन रोग गाय व म्हैस वर्गात होत असल्यामुळे जनावरांना ताप येणे, जनावरांच्या तोंडात श्वसन नलिकेत व घशात गाठी येतात व दूध देण्याचे प्रमाण कमी होणे, गाभण जनावर गर्भपात होणे, ओढ काम करणाऱ्या जनावरांची कार्यक्षमता कमी होने अशी लक्षण दिसून येतात व जनावरे दगावण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या रोगाचा प्रसार इतर तालुक्यात व जिल्ह्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर लम्पी स्कीन या आजाराचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून प्राण्यांमध्ये संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत लवकरात लवकर उपाययोजना कराव्या व योग्य ते नियोजन करून जनावरांचे लसीकरण तातडीने करण्याची मागणी क्रांतीसेनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अमोलआण्णा शेळके, राष्ट्रीय गो रक्षा मंचचे गणेश सदाफुले, विकास मदने, अमर तापडिया आदींनी केली आहे.