साखर कामगारांच्या वेतनवाढीचा मसुदा राज्य शासनाला लवकरच सादर करु – तात्यासाहेब काळे
पुणे येथील राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीप्रसंगी तात्यासाहेब काळे यांचा सत्कार करताना शेषनारायण म्हस्के, एकनाथ जगताप, शंकरराव भोसले, अशोकराव पवार आदींसह मान्यवर.
पुणे : राज्यातील साखर कामगारांच्या वेतन वाढीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपत आहे. नवीन वेतनवाढ मिळावी यासाठी शासनाकडे सर्व समावेशक वेतनवाढीची मागणी करण्यात येणार आहे. तथापी नवीन वेतनवाढ देण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठित करावी, या मागणीसह बदलाची नोटीस व करावयाच्या मागण्यांचा मसुदा तयार करून तो राज्य शासनास लवकर सादर करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.
पुणे येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्यालयात काळे यांच्या अध्यक्षेतेखाली प्रतिनिधी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना काळे बोलत होते. साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, रावसाहेब पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, नितीन बेनकर, अशोक बिराजदार, प्रदीप शिंदे, सचिव सयाजी कदम, राजेंद्र तावरे, संजय मोरवाळे, संजय पाटील, योगेश हंबीर, मुळा कारखाना साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार, सेक्रेटरी डी.एम.निमसे, पाथर्डी तालुका राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सदस्य शेषनारायण म्हस्के, एकनाथ जगताप आदि यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ देणाऱ्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपत असून त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करावी, बदलाची नोटिस देणे, या आणि इतर मागण्यांचा मसुदा तयार करून राज्य शासनाला सादर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.