अहिल्यानगर

वारकरी संप्रदायाचा अपमान सहन केला जाणार नाही- देवेंद्र लांबे पाटील

मराठा एकीकरण समिती वारकऱ्यांच्या पाठीशी

राहुरी- तालुक्यातील गुहा येथे सोमवार दि.१३ नोव्हेंबर २०२३ रोजी सोमवती अमावास्यानिमित्त कानिफनाथ उर्फ कान्होबा मंदिरात नवनाथ पारायण, आरती व भजन करण्यासाठी गावातील गावकरी, भजनी मंडळ एकत्रित जमले असता गावातीलच काही लोकांनी भजनी मंडळातील जेष्ठ सदस्यांवर हल्ला करत भजनी मंडळाच्या साहित्यांची अवहेलना केल्याने संतांचा शांततेचा संदेश देणार्या वारकरी संप्रदायाची हेळसांड कदापी सहन केली जाणार नसल्याचा इशारा मराठा बहुुउद्देशिय संस्था संचालित मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे पाटील यांनी दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, संतांचा शांततेचा संदेश देणारे वारकरी संप्रदाय यांच्यावर गुहा गावातील कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज मंदिराच्या वादावरून भजन करण्यास विरोध करून टाळ पखवादाची हेळसांड केलेली कदापी सहन केले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून वारकरी संप्रदयाला मानाचे स्थान राहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक होण्याअगोदर पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांवर बहादूर खानाने हल्ला केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी बहादूर खानाला निस्तनाबूत करत वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तींचा बिमोड करत इतिहास घडविला होता.

महाराष्ट्राच्या इतिहासात वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांची गय केली जात नाही हा इतिहास साक्षीला असतांना गुहा येथिल वारकऱ्यांवरील हल्ल्याने जनसामान्य लोकांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत.छ वास्तविक सदरील घटनेत धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न झालेला आहे. सबंधित नीच मानसिकता असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याच विषयास अनुसरून पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक अहमदनगर यांना मराठा एकीकरण समितीच्या वतीने वारकऱ्यांचा अपमान करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

मराठा एकीकरण समिती वारकऱ्यांच्या पाठीशी असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाविरोधात मराठा एकीकरण समितीच्या वतीने कुठलीही पूर्व कल्पना न देता आंदोलन छेडण्याचा इशारा देवेंद्र लांबे पाटील यांनी दिला आहे. सदर घटनेचा वारकरी संप्रदायाबरोबर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button