साहित्य व संस्कृती
औरंगाबाद येथे ११ वे अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न
औरंगाबाद – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रेरणेतून प्रगतशील लेखक संघाच्या वतीने औरंगाबाद येथे अकरावे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनामध्ये नागपूर येथील कवी प्रसेनजीत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन झालं.
यावेळी प्रल्हाद पवार, दिंडोरी यांनी चळवळीतील कार्यकर्ता ही कविता सादर करून चळवळीचे बदलते स्वरूप उघड केले. त्यानंतर सुरेश साबळे, बुलढाणा यांनी व्यवस्था आणि माणसं, पंजाबराव येडे, अमरावती यांनी भाकरीचं बंड, भगवान राऊत यांनी सत्तेचा माज या कविता सादर केल्या. कवियत्री शर्मिला गोसावी यांनी माय ही कविता सादर करून सभागृहात वाहवा मिळवली. त्या आपल्या कवितेत म्हणतात, माय इथेही उगवतो दिवस, रोज साडेपाचच्या भोंगल्यानंतर, तू शिकवलं होतं सारं तसंच करते, तु सुन सोडलेल्या कपाळावर मी थोडसं कुंकू रेखाटते… मग तूच सांग ना ग माय मी वेगळ काय करते ? अशा प्रकारे हिंदू आणि मुस्लिम धर्मातील बदलते सांस्कृतिक संदर्भ त्यांनी आपल्या कवितेतून मांडले.
राज रणधीर ( जालना ), बाळासाहेब नागरगोजे ( बीड ), सुनील उबाळे, आशा डांगे, सुरेश शेवाळे, शंकर तुळजापूर, प्रमोद अहिरे ( नाशिक ), संजय थोबाड यांनी कविता सादर करून धर्मा बदलचे स्वरूप समोर आणले. प्रसेनजित तेलंग, अमरावती यांनी छोट्या मुलीचा आपल्या बापाशी असलेल्या संवाद कवितेतून सादर केला. काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन धम्मपाल जाधव यांनी बहारदारपणे केले. यावेळी सभागृहात जेष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, मार्गदर्शक उत्तम कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ॲड सुभाष लांडे पाटील, स्वागताध्यक्ष इकबाल मिंन्ने, बन्सी सातपुते, प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ९० वर्षाचे कॉम्रेड इकबाल पेंटर, पाटोदा यांनी अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या समवेत व्यतीत केलेल्या काही आठवणी सादर करून आपली कविता सादर केली. त्यामुळे थेट अण्णाभाऊंचा स्पर्श या काव्य संमेलनाला आल्याचा आभास उपस्थित सभागृहाला झाला.