कृषी
सक्तीची वीजबिल वसुली थांबवून वीजबिल माफ करण्यासाठी प्रहारचे रास्ता रोको आंदोलन
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : सक्तीची वीजबिल वसुली थांबवून वीजबिल माफ करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष, विविध सामाजिक संघटना व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने राहुरी शहरातील बाजार समिती समोर, नगर मनमाड रोडवर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या रस्ता रोको आंदोलनाप्रसंगी बोलताना सुरेशराव लांबे म्हणाले की, प्रहार जनशक्ती पक्ष हा महाविकास आघाडी सरकार सोबत सत्तेत आहे. परंतु शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तेथे प्रहार करण्याचे तंत्र ना. बच्चु कडु यांचे असल्याने आज हे सरकारविरोधी आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले. पुढे बोलताना लांबे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी, सततचा लॉकडाऊन, जागतीक संकटामुळे कोणत्याही शेतीमालाला भाव नाही, दूधाला भाव नाही या विविध समस्यांमुळे शेतकरी हैराण होवून मेटाकुटीस आलेला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल, रासायनिक खते, पशुखाद्य, कृषिसेवा औषधे, वाढती मजुरी इत्यादी बाबींचे भाव गेल्या दोन वर्षात प्रचंड वाढलेले आहेत. त्यामुळे शेतीधंदा संपूर्ण पणे कोलमडून गेलेला आहे. रोज कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा भयानक परिस्थितीला शेतकरी वर्ग सामोरा जात आहे. अशातच महावितरण कंपनीने शेतक-यांकडून कृषी पंपाची सक्तीची विजबील वसूली सुरु केलेली आहे. विजबिल वसूली करताना शेती कृषि पंपांचा विज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे जे काही पिके शेतात उभी आहेत, ते पिकेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी उध्दवस्त करण्याचे पाप राहुरी तालुक्यात होत आहे. तसेच सध्या ऊर्जा राज्यमंत्री पद राहुरी तालुक्याकडे असून सुद्धा सगळ्यात जास्त अन्याय राहुरी तालुक्यावरच होत आहे. तरी सर्व महावितरण अधिकार्यांनी शेती पंपाचे ट्रान्सफार्मर बंद करू नये असे आदेश त्वरीत द्यावेत व शेतक-यांचे संपूर्ण विज बिल माफ करावे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांची झालेली नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी कमीत कमी २५ हजार रुपये सर्व शेतक-यांच्या खात्यात जमा करावे अशी आंदोलनाव्दारे शासनाकडे मागणी केली आहे.
या आंदोलनाला भारतीय जनसंसद, वंचित बहुजन आघाडी, एकलव्य परिषद व तालुक्यातील इतर विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, शेतकरी बांधवांनी जाहिरपणे पाठिंबा दिला. यावेळी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. आईन सणासुदीचे दिवस असल्याने बाहेरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वाहन कोंडीचा बऱ्याच वेळ मानसिक त्रास सहन करावा लागला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सुरेश लांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात नितीन पानसरे, शिरिष गायकवाड, वंचीत आघाडीचे पिंटू साळवे, कुमार डावखर, बापू पटारे, प्रशांत पवार, संतोष जगदाळे, युनुस शेख, अरुण साळवे, नवनाथ देवरे, आतोंवन गायकवाड, संदीप लोहकणे, गणेश थोरात, ॲड.भाऊसाहेब पवार आदींसह आंदोलक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांचे निवेदन तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी स्वीकारले. पोलिस प्रशासनाच्या वतीने पीआय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सुरेश लांबे, नितीन पानसरे, कुमार डावखर आदिंनी शासनाच्या शेतकरी विरोधी सुरु असलेल्या कारभारावर सडकुन टिका केली.