गो पूजा हिच ईश्वर पूजा – आमदार रोहित पवार
कर्जत : तालुक्यातील राक्षसवाडी येथे कै. सावित्रीबाई देविदास पावणे यांच्या स्मरणार्थ रक्षाई बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने ह.भ.प. हनुमंत पावणे महाराज यांच्या नेतृत्वाखाली गोशाळा स्थापन करण्यात आली आहे. आज, पत्रकार दिनानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले.
यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, “गो पूजा ही ईश्वर पूजेसमान आहे. गाईंची काळजी घेणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. हा उपक्रम रक्षाई बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे, जो ग्रामीण भागात गोसंवर्धन व संरक्षणाच्या दिशेने महत्वपूर्ण भूमिका बजावेल. गोशाळेच्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश दिला जात आहे.”
या कार्यक्रमात अखिल भारतीय क्रांती सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष दरेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यानंतर आमदार रोहित पवार यांनी गोशाळेची पाहणी केली व गोशाळेला भविष्यात कोणत्याही अडचणी आल्यास मी नक्कीच मदत करीन, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला ह.भ.प. हनुमंत पावणे महाराज, अखिल भारतीय क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, युवक जिल्हाध्यक्ष शब्बीर शेख, हिरडगाव ग्रामपंचायत सरपंच विद्याताई बनकर, माजी सरपंच दीपाली दरेकर, सुनिता दरेकर, उपसरपंच चिमाजी दरेकर, तसेच राक्षसवाडी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते.