हरिगाव येथे नाताळ सणानिमित्त कॅंडल मिरवणूक व पथनाट्याद्वारे देखावे सादर
![](https://www.krantinama.com/wp-content/uploads/2024/12/Picsart_24-12-30_21-02-35-787-780x470.jpg)
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) – तालुक्यातील संत तेरेजा चर्च, मतमाऊली भक्तिस्थान येथे सालाबादप्रमाणे नाताळ सणानिमित्त गावातून भव्य कॅंडल (मेणबत्ती) मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत असंख्य भाविक तसेच प्रमुख धर्मगुरू रे. फा. डॉमिनिक रोझारिओ, फा. संतान रॉड्रीग्ज, फा. फ्रान्सिस ओहोळ आदी सहभागी झाले होते. सर्वांनी हातात मेणबत्त्या घेऊन मिरवणुकीत भाग घेतला.
मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी बालकलाकारांनी पथनाट्याद्वारे देखावे सादर केले. या वेळी प्रमुख धर्मगुरू फा. डॉमिनिक यांनी सांगितले की, “ख्रिस्तजयंतीच्या या पवित्र आठवड्यात आयोजित शांती मिरवणुकीचा उद्देश बाळ येशूच्या शांतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा आहे. बाळ येशूच्या जन्माचा देखावा गावभर सादर करून त्याच्या प्रेम, दया आणि समजुतीचा संदेश सर्वत्र पसरवणे हे आपले कर्तव्य आहे. बाळ येशूच्या तारणदायी संदेशाची शुभवार्ता संपूर्ण जगात पोहोचावी, हीच आमची अपेक्षा आहे.”
पथनाट्याचे सूत्रसंचालन शिल्पा पठारे यांनी उत्कृष्टपणे केले. या निमित्ताने दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता पवित्र संगीत मिस्सा आणि १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता नूतन वर्षाच्या निमित्ताने पवित्र मिस्सा आयोजित करण्यात आले आहेत. सर्वांनी या कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.