कृषी

कृषि विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापकांना राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी मोठी संधी-ए.एस.आर.बी. सदस्य डॉ. द्विवेदी

राहुरी विद्यापीठ : कृषि विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच प्राध्यापक कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करीत असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा माध्यमांचा अवलंब केला पाहिजे. विद्यार्थ्यांना जे.आर.एफ. तसेच एस.आर.एफ च्या माध्यमातून शिक्षणाची संधी येथे मिळू शकते. येथील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होऊ शकते असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे सदस्य डॉ. बी. एस. द्विवेदी यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेद्वारे जे.आर.एफ., एस.आर. एफ., कृषि शास्त्रज्ञ तसेच लॅटरल इंट्रीद्वारे रोजगाराच्या संधी तसेच शिष्यवृत्तीच्या संधी आणि कृषिच्या संवर्धनासाठी संवाद या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के होते. याप्रसंगी नागपूर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय माती सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. एन. जी. पाटील, अधिष्ठाता (कृषि) डॉ. साताप्पा खरबडे,विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. अनिल काळे आणि डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बी. एस. द्विवेदी यांनी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप तसेच त्यासाठी करावयाची तयारी यावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सैनिक जसा देशासाठी सीमेवर जाऊन लढतो तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. सचिन नलावडे यांनी मानले.

या कार्यक्रमानंतर विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प, काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स या प्रकल्पांना मान्यवरांनी भेटी दिल्या. सकाळच्या सत्रामध्ये नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. वंदना द्विवेदी यांनी शेतीच्या शाश्वततेसाठी जमिनीच्या आरोग्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भारत सरकार जमीन आरोग्य पत्रिकांच्या माध्यमातून जमिनीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत असून नैसर्गिक शेतीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार उपस्थित होते.

या भेटीच्या वेळी डॉ. सचिन नलावडे, डॉ. सुनील कदम, डॉ. पवन कुलवाल यांनी ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोट तंत्रज्ञान, सेन्सर,आय. ओ. टी., डिजिटल स्पेक्ट्रोमीटर संदर्भातील माहिती मान्यवरांना दिली. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पातील संशोधन सहयोगी तसेच पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button