देशातील विविध परंपरा, संस्कृती, जाती-धर्म या सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम संविधनाने केले – कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील
राहुरी | जावेद शेख : भारतरत्न आणि ज्येष्ठ घटनातज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क दिला आहे. त्यानुसार जागरूकपणे आपला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावणं अत्यावश्यक आहे. डॉ. आंबेडकरांनी मोठ्या संघर्षातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी प्रदान केलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे बाहेरच्या देशांमध्ये जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतले. देशाची लोकशाही मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून इतर अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या देशाचे संविधान लिहिण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. देशातील विविध परंपरा, संस्कृती, जाती-धर्म या सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम संविधनाच्या माध्यमातून घडत आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
कृषि महाविद्यालय, पुणे येथे डॉ. आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड, विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. अरुण कांबळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी, डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते.
आपल्या भाषणात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पुढे म्हणाले की देशाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून रिझर्व बँक ऑफ इंडिया तसेच राष्ट्रीय वित्त आयोगाची स्थापना हे महत्त्वपूर्ण आणि मोलाचे निर्णय आंबेडकरांनी घेतले. कृषिमंत्री असताना पाण्याची टंचाई दूर व्हावी म्हणून नद्या जोड प्रकल्प सुरू करण्याची संकल्पना, भाक्रा नांगल प्रकल्प असे अतिशय दुरगामी महत्त्वाचे धोरणात्मक विचार त्यांनी मांडले. संविधान चांगले असले तरीही ते राबवणारे लोक संवेदनशील आणि कार्यतत्पर असले पाहिजेत तरच लोकशाही प्रगल्भ होऊ शकते म्हणून वैयक्तिक स्वार्थापलीकडे देश हिताचे कार्य नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने यथाशक्ती डॉ. आंबेडकरांच्या महान कार्याचे अनुकरण करणे अत्यावश्यक आहे. सर्व महापुरुष हे जाती धर्मापलीकडे आपल्या विचारांनी चिरंतन राहत असतात.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. रवींद्र बनसोड तसेच विद्यार्थी प्रतिनिधी स्नेहा पवार, निलसागर खाडे, पुजा गुंजवटे, श्रेया शहा आणि नागार्जुन जाधव यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महान कार्याचे विविध पैलू आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश चांदगुडे यांनी केले तर आभार साक्षी कळंत्रे यांनी मांडले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.