राहुरी तालुक्यातील ‘त्या’ गावच्या पोलिस पाटलाचे निलंबन
देवळाली प्रवरा | प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील तांभेरे येथिल पोलिस पाटील उत्तम आप्पासाहेब मुसमाडे यांनी कर्तव्यात कसुर करुन इतर खाजगी ठिकाणी कंपनीत काम करत असल्याने, तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना काळात जिल्हाबंदीचे आदेश लागु केलेले असतांना आदेशाचे उल्लघंन केल्याने पोलीस पाटील उत्तम मुसमाडे यांना पोलिस पाटील पदावरुन श्रीरामपूर विभागाचे प्रांतधिकारी किरण सावंत यांनी निलंबन केल्याचे आदेश काढले. राज्यात पोलिस पाटलास निलंबित केल्याची घटना प्रथमच राहुरी तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती संघाचे कार्याध्यक्ष दादासाहेब पवार यांनी पोलिस पाटील उत्तम आप्पासाहेब मुसमाडे यांनी कर्तव्यात कसुर करुन इतर खाजगी ठिकाणी कंपनीत काम करत असल्याने तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना काळात जिल्हाबंदीचे आदेश लागु केलेले असतांना आदेशाचे उल्लघंन केल्याची तक्रार श्रीरामपूर विभागाचे प्रांतधिकारी यांच्याकडे केली होती. सदर तक्रारीची पोलिस निरीक्षक व राहुरीचे तहसिलदार यांनी स्वतंञ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार प्रांतधिकारी यांनी सुनावणी घेवून सादर केलेल्या चौकशी अहवालाचे व समवेत सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तांभेरे येथिल पोलीस पाटील उत्तम आप्पासाहेब मुसमाडे हे अंभोरा ता. आष्टी येथील एका खाजगी कंपनीत काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्याअर्थी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ व महाराष्ट्र ग्रामपोलीस भत्ते आणि सेवाशर्ती आदेश १९६८ मधील कलम १० नुसार पोलीस पाटलास स्वतः जमीन कसणे किंवा ती धारण करणे, किंवा गावात इतर अन्य व्यवसाय करता येईल. मात्र अशा शेतीचा किंवा अन्य व्यवसाय त्याचे पोलीस पाटलाचे नित्याचे कामास हरकत असणारा नसावा. परंतु, त्यास पुर्ण वेळेची नोकरी करता येणार नाही असे नमुद आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ चे कलम ९ व ११ अन्वये कोणत्याही पोलीस पाटलांने पोलीस पाटलाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी दुर्लक्ष केले असल्याचे कागदपञावरुन निष्पन्न झाले आहे.
तांभेरे येथिल पोलीस पाटील पदावर रुजु होते वेळी उत्तम आप्पासाहेब मुसमाडे यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील अधिनियम १९६७, आदेश १९६८ व शासन नियमातील तरतुदीनुसार अटी व शर्ती मान्य असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्या आधारे दहा वर्षाच्या मुदतीकरीता महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील ( सेवा प्रवेश, वेतन, भत्ते आणि सेवेच्या इतर शर्ती ) आदेश, १९६८ यांच्या उपबंधास व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाच्या अधिन राहून नेमणूक करण्यात आली होती. परंतू पोलिस पाटील उत्तम मुसमाडे यांनी त्यांचेविरुध्द प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने सादर केलेला खुलासा समाधानकारक वाटत नाही. राहुरीचे तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांच्या अहवालानुसार उल्लंघन केले असल्याने पोलिस पाटील उत्तम मुसमाडे यांना पोलिस पाटील पदावर देण्यात आलेली नियुक्ती रद्द करुन महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ चे कलम ९ चे पोट कलम (ड) अन्वये सेवेतून निलंबित करण्याचे आदेश प्रांतधिकारी किरण सावंत यांनी दिले आहे.