ज्या पक्षाच्या जाहीरनाम्यात इपीएस पेन्शनवाढीचा उल्लेख असेल त्याच पक्षाला मतदान – सुभाष कुलकर्णी
श्रीरामपूर येथे पेन्शनधारकांचा मेळावा संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर कामगार हॉस्पिटल सभागृह येथे महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने इपीएस ९५ पेन्शनधारकांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात असा ठराव करण्यात आला की, ज्या पक्षाच्या जाहीरनाम्यात इपीएस ९५ पेन्शनधारकांना किमान ९ हजार रुपये देण्याचा उल्लेख असेल तरच पेन्शनधारकांनी त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे, असा ठराव सुभाष कुलकर्णी यांनी मांडला. त्यास अंकुश पवार यांनी अनुमोदन दिले. मेळाव्यास २०० पेन्शनधारक उपस्थित होते.
या मेळाव्यास संघटना अध्यक्ष एस एल दहिफळे, पांडुरंग गाडे राहता, सचिन क्षीरसागर अहमदनगर, मधुकर घोगरे लोणी, रामदास डमाळे श्रीरामपूर, भाऊसाहेब पटारे अशोकनगर, गंगाधर पटारे श्रीरामपूर, अंकुश पवार राहुरी, बाबूलाल पठाण साकरवाडी, चंद्रकांत डोखे पुणतांबा, ज्ञानदेव आहेर लोणी आदींची भाषणे झाली. भाषणात सर्वांनी ठरावाला पाठींबा जाहीर केला.
अध्यक्ष एस एल दहिफळे यांनी सांगितले की, संघटना गेल्या १२ वर्षापासून सतत आंदोलने करून लढा देत आहे. व पेन्शन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु एक रुपया सुद्धा वाढ करण्यात आली नाही. २०१३ मध्ये खा.भगतसिंह कोशियारी समितीने केंद्र सरकारला अहवाल सादर केला. तो स्वीकारला नाही. अनेक बैठका झाल्या तरी निर्णय नाही. समितीने ३ हजार रुपये पेन्शन द्यावी अशी शिफारस केली होती. समितीचा अहवाल स्वीकारला असता तर आता ९ हजार रुपये पेन्शन मिळाली असती. पेन्शनधारकांना किमान ९ हजार रुपये पेन्शन मिळावी व वैद्यकीय सुविधा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने अनेक घटकांना सुविधा दिल्या पण हा प्रश्न प्रलंबित ठेवला. तरी हा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे. बाबुराव दळवी यांच्या आभार प्रदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली.