आता महात्मा फुले कृषी विद्यापीठातही होणार किड, बुरशी व तणनाशकांच्या अवशेषांची पडताळणी
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाच्या किडनाशक अंश विश्लेषण प्रयोगशाळेस एलसी – एमएस / एमएस हे उपकरण मिळाले आहे. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांपैकी फक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागामध्ये अखिल भारतीय किडनाशक अंश पृथःकरण योजना कार्यरत आहे. या प्रयोगशाळेला एन.ए.बी.एल.चे नामांकण प्राप्त आहे. या योजनेला भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचा 75 टक्के अर्थसहाय्य व महाराष्ट्र शासनाचे 25 टक्के अर्थसहाय्यातून किडनाशक अंश विश्लेषण प्रयोगशाळेस एलसी-एमएस / एमएस हे उपकरण खरेदी केले आहे. या उपकरणाची पाहणी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी नुकतीच प्रयोगशाळेला भेट देवून या उपकरणाचे उद्घाटन केले.
यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. साताप्पा खरबडे, अधिदान व लेखा अधिकारी सुर्यकांत शेजवळ, किडनाशक अंश विश्लेषण प्रयोगशाळेचे डॉ. भाई देवरे व डॉ. योगेश सैंदाणे उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उद्घाटन करताना म्हणाले या उपकरणामुळे किडनाशक अंश विश्लेषण प्रयोगशाळेची गुणवत्ता, अचुकता व विश्वासाहर्ता वाढली आहे. या विभागाच्या विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेतील संशोधनावर आधारीत लेख नासरेटेड जर्नलमध्ये प्रसिध्द करावेत. याप्रसंगी डॉ. सी.एस. पाटील यांनी या उपकरणाविषयी माहिती देताना सांगितले की भाकृअपद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून विविध फळे व भाजीपाला यांचे नमुने गोळा करुन या उपकरणाद्वारे त्यामधील किडनाशके, बुरशीनाशके व तणनाशके यांच्या अवशेषांची पडताळणी केली जाणार आहे. या उपकरणाद्वारे एका नमुन्यातून एकुण 200 पेक्षा जास्त किटकनाशकांची तपासणी करणे शक्य होणार आहे.
किटकशास्त्र विभागातील सदरची प्रयोगशाळा ही पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव प्रयोगशाळा असून जीला एन.ए.बी.एल.चे नामांकन मिळालेले असल्याचे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पीक संरक्षणाच्या शिफारशी, एम.एस्सी व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनावर आधारीत कॉम्पोंडीयम या पुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सी.एस. पाटील यांनी केले तर आभार डॉ. भाई देवरे यांनी मानले.