आचारसंहितेच्या नावाखाली आकारी पडितांचे आंदोलन चिरडून देणार नाही – जिल्हाध्यक्ष औताडे
प्रांत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा आकारी पडीत संघर्ष समितीचा इशारा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : गेल्या चार दिवसांपासून श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर शेकडो आकारी पडित शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. सदर आंदोलनात उपोषणकर्ते बाळासाहेब आसने व ॲड. सर्जेराव घोडे यांनी अन्नत्याग केलेला आहे. आज रोजी आंदोलनाला पाच दिवस उलटून गेले तरी सरकारने या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नसल्याने आंदोलकांनी सोमवार, दि. १८मार्च रोजी दु. १२ वा. प्रांताधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला असून तशा आशयाचे लेखी पत्रही श्रीरामपूर तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले आहे.
वास्तविक पाहता राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १५ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजेपर्यंत नगर दक्षिणचे दौरे केले परंतु पाच दिवस उलटूनही आकारी पडित संवेदनशील व प्रलंबित प्रश्नाबाबत सुरू असलेल्या आंदोलनास भेट दिलेली नाही. यावरून शासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळेच उपोषणकर्ते शेकडो शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांनाच निवेदन दिले आहे.
याबाबत शुक्रवारी तहसीलदार मिलिंद वाघ, श्रीरामपूर शहरचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आंदोलनकर्ते शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शरद आसने, दादासाहेब आदिक, सोपान नाईक, साहेबराव चोरमल यांच्यासोबत उद्या १६ मार्च २०२४ रोजी तीन वाजेपासून लागू होत असलेल्या आचारसंहिते बाबत चर्चा केली. सदर चर्चेअंती तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दि. १६ मार्च २०२४ रोजी ३ वाजेनंतर आंदोलनास प्रशासकीय इमारतीमध्ये बसता येणार नाही असे सूचित केले. यावरून उद्या तीन वाजेनंतर आम्ही आचारसंहिता भंग प्रकरणी आपणावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे अप्रत्यक्ष सांगण्यात आले. यावर आकारी पडित संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सांगितले की, आमचे आंदोलन हे १२ तारखेपासून सुरू असून त्यास उद्या पाच दिवस होत आहे. या पाच दिवसाच्या कालावधीत शासनाने उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेट देऊन आकारी पडित प्रश्न लेखी देऊन आश्वासित करून विश्वासार्हता दर्शविणे गरजेचे होते. परंतु तसे न होता शासनाने आचारसंहितेच्या नावाखाली सदर आंदोलन दडपण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सदर बाब खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांचा लढा न्याय मिळेल पर्यंत लढू असा निर्धार आकारी पडित संघर्ष समितीने केला.
यावेळी आंदोलनात सुरेश गलांडे, विरेश गलांडे, चंद्रकांत उंडे, बाळासाहेब पटारे, भरत आसने, राजेंद्र पाऊलबुध्दे, विजय आदिक, ॲड विष्णूपंत ताके, शरद पवार, राजेंद्र आदिक, मालन झुरळे, सागर मुठे, विठ्ठलराव आसने, डॉ बबनराव आदिक, बाळासाहेब पगारे, सदाभाऊ उघडे, वैभव आढाव आदींनी सहभाग नोंदवून पाठिंबा दिला. तालुक्यातील प्रलंबित असलेल्या आकारी पडीत प्रश्न तालुक्यातील सर्वच सामाजिक राजकीय थोर मोठ्या नेत्यांनी सहभाग नोंदविला आहे. तरी शासनाने उद्या तीन वाजेच्या आत आंदोलनास संवेदनशील मार्गाने विचार करून आकारी पडीत प्रश्न सोडविण्यासाठी लेखी आश्वासित करावे असे आकारी पडीत संघर्ष समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.