कृषी

कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी प्रेरित होणे गरजेचे – पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निमसे

राहुरी विद्यापीठ : कोरोना काळापासून कोंबडीचे मांस व अंड्यांना मागणी वाढली आहे. अंडी चांगल्या भावाने विक्री केली जाते. ग्रामीण भागातील तरुणांनी व महिलांनी नोकरीच्या मागे न लागता शास्त्रोक्त पध्दतीने परसबागेतील कुक्कुटपालन करणे गरजेचे आहे. चिंचविहिरे व कणगर या गांवाची ओळख कुक्कुटपालनाचे गाव म्हणुन होणे गरजेचे आहे. परसबागेतील कुक्कुटपालन हा व्यवसाय म्हणुन वाढ होण्यासाठी तरुणांनी व महिलांनी प्रेरित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र निमसे यांनी केले.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील व भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतीय कृृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे परसबागेतील कुक्कुटपालन या विषयी राहुरी तालुक्यातील कणगर येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रामचे आयोजन करण्यात आले होते या वेळी डॉ. रविंद्र निमसे बोलत होते. याप्रसंगी प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, प्रगतशील शेतकरी रावसाहेब गाढे, सुर्यभान गोपाळे व सौ. सविता नालकर उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. रविंद्र निमसे पुढे म्हणाले की कोंबडी पासून 18 टक्के प्रोटीन मिळते. परसबागेतील कुक्कुटपालन शेतकर्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केल्यास कुटुंबाला आर्थिक उत्पन्नाचा हातभार मिळेल. चिंचविहिरे व कणगर येथील तरुणांनी व्यवसाय वाढविण्यासाठी अंडी उबवण केंद्र स्थापन करुन पक्षी निर्मिती करणे गरजेचे आहे.

याप्रसंगी डॉ. भगवान देशमुख स्वागत व प्रास्ताविक करतांना म्हणाले की शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय वाढविणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे यांनी तर आभार किरण मगर यांनी मानले. यावेळी कणगर व चिंचविहिरे गावातील 50 पेक्षा जास्त शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल कोर्हाळे व किरण मगर यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button