महात्मा फुले कृषि विद्यापीठामार्फत सुत्रकृमी सर्वेक्षण कार्यक्रम संपन्न
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि किटकशास्त्र विभागाच्या अखिल भारतीय समन्वित सुत्रकृमी संशोधन योजनेमार्फत राहाता तालुक्यातील पेरु उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देवून सुत्रकृमींचे सर्वेक्षण करण्यात आले.
या सर्वेक्षणाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक तथा किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. राहाता येथील साकुरी परिसरातील संपर्क शेतकरी राजेंद्र रोहम, सचिन बोठे आणि आदित्य रोहोम यांच्या पेरुच्या बागांना भेटी देण्यात आल्या.
यावेळी त्यांना सुत्रकृमीची ओळख करुन देण्यात आली. झाडांचे माती व मुळाचे नमुने घेण्यात आले. यावेळी सुत्रकृमींची ओळख व व्यवस्थापन या विषयावर सहाय्यक प्राध्यापक (सुत्रकृमी) डॉ. पल्लवी पाळंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रकल्पाचे संशोधन सहयोगी विनोद पवार व हरिचंद्र भुसारी यांनी मातीचे व मुळांचे नमुने घेतले.
या भेटी दरम्यान या चमुने शेतकर्यांच्या समस्या जाणुन घेतल्या आणि शंकांचे निरसन केले. त्याप्रमाणे त्यांच्या पिकांवरील किडीचे (सुत्रकृमी) विश्लेषण करुन आणलेले सुत्रकृमीचे नमुने सुक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने दाखवून, सुत्रकृमी किडीची ओळख प्रात्यक्षिकाद्वारे करुन दिली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.