कृषी

शेतकर्यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा- सोयाबीन पैदासकार डॉ. देशमुख

राहुरी विद्यापीठ – सोयाबीन हे पीक 100 ते 115 दिवसांचे आहे. सोयाबीनमध्ये 18 टक्के तेलाचे व 43 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. जगातील सोयाबीन उत्पादनापैकी 80 टक्के सोयाबीनपासून तेलनिर्मिती केली जाते. तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीचा उपयोग पशुखाद्यासाठी केला जातो.

आंतरराष्ट्रीय पातळीवर या सोयाबीन पेंडीचा दर हा सोयाबीनच्या दरासाठी कारणीभुत असतो. या बहुगुणी सोयबीनचे जागतिक बाजारपेठेच्या मागणीमुळे दरवर्षी सोयाबीनचे भाव वाढतच आहे. शेतकर्यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होईल, असे प्रतिपादन सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी केले.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे सोयाबीन व तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम कानडगाव येथे आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी या प्रशिक्षण कार्यक्रमात सोयाबीन पिकावर मार्गदर्शन करतांना कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली येथील सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख बोलत होते. योवळी कानडगावचे माजी सरपंच लक्ष्मण गागरे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. दत्तात्रय पाचारणे, बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. नारायण मुसमाडे व सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ उपस्थित होते.

या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व तूर या पिकांची प्रात्यक्षिके शेतकर्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कानडगाव या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी डॉ. नंदकुमार कुटे यांनी तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. नारायण मुसमाडे यांनी बीज प्रक्रिया व तिचे महत्त्व याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले.

भा.कृ.अ.प. शेतकरी प्रथम प्रकल्पातून अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाची माहिती मिळत असल्याने कानडगावचे माजी सरपंच लक्ष्मण गागरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित विद्यापीठ शास्त्रज्ञांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ व आभार विजय शेडगे यांनी मानले. या कार्यक्रमाला तांभेरे, कानडगाव, चिंचविहिरे व कणगर या गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किरण मगर, राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button