अहिल्यानगर
रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथे मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील यांचा स्मृतीदिन साजरा
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ यांच्या संयुक्त विद्यमाने थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी आमदार काॅ.पी.बी कडू पाटील यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय शांताबाई कडू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. कोव्हिडचे नियम पाळून छोटे खाणी कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी संकुलाचे प्राचार्य अशोक वानखेडे यांनी मातोश्री शांताबाई कडू यांच्या जीवन कार्याचा परिचय देताना सांगितले की, 1942 च्या स्वतंत्र लढ्यात काॅ.पी.बी कडू पाटील सक्रिय असताना मातोश्री शांताबाईंनी कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे पार पाडली. यामध्ये शेती, मुलांचे शिक्षण व संस्कार, घरी आलेल्या अतिथींचा सन्मान करणे. एकंदरीत कौटुंबिक व्यवहाराची जबाबदारी चोखपणे पार पाडत असताना, कुटुंबाची प्रतिष्ठा थोडी सुद्धा कमी होऊ दिली नाही. शेतावर काम करणाऱ्या गोरगरीब स्रियांची मुले सांभाळणे, प्रसंगी लहान मुलांना अन्न भरविणे, स्वतंत्र चळवळीत सक्रिय असणाऱ्या क्रांतिकारकांना अन्नदान करणे, यासारखी विविध कामे त्यांनी अतिशय समर्थपणे पार पाडली. त्यामुळे स्वर्गीय शांताबाई कडू पाटील या आजही सात्रळ पंचक्रोशीत ख-या अर्थाने सर्वांच्या मातोश्री म्हणून ओळखल्या जातात.
भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव हे मूल्य या कुटुंबांने प्राचीन काळापासून जपले आहे. एकंदरीत स्वर्गीय शांताबाई कडू पाटील या एक आदर्श गृहिणी, आदर्श धर्मपत्नी आणि मातोश्री म्हणून जनसामान्यांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहिलेल्या आहेत. त्यांचा एखादा तरी आदर्श नव्या पिढीतील स्त्रियांनी घ्यावा. असा आशावाद व्यक्त करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सिताराम बिडगर यांनी अध्यक्षीय मनोगतात मातोश्री शांताबाईंचा जीवनपट स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्कूल कमिटी सदस्य बबनराव कडू, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार किशोर भांड, जेष्ठ नागरिक भगवान गागरे, पर्यवेक्षक सिताराम बिडगर, प्रा.विलास दिघे तसेच सर्व सेवकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिराज मन्सुरी यांनी केले तर आभार विलास गभाले यांनी मानले.