पेमगिरीत हनुमान जन्मोत्सव दिनी भारतातील सर्वात उंच हनुमान गदेचे लोकार्पण
विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थितीत लोकार्पण
संगमनेर | बाळासाहेब भोर : ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या व नैसर्गिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या मौजे पेमगिरीत हनुमान जन्मोत्सव दिनी गुरुवार, दि. ६ एप्रिल रोजी भारतातील सर्वात उंच ३० फूट उभ्या स्वरूपातील हनुमान गदेचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ५ वाजता मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे.
पर्यावरणपूरक असे घटक वापरून ही महाकाय व तितकीच सुबक व टिकाऊ असणारी गदा पेमगिरीतील हनुमान मंदिराच्या उजव्या बाजूला साकारण्यात आली आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच या गदेचाही लोकार्पण सोहळा म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे उभ्या स्वरूपातील आजमितीला ही भारतातील सर्वात उंच गदा आहे.
ऐतिहासिक शहागड, नैसर्गिक महावड, मोरदरा धरण, पुरातन बारव, भव्य हनुमान मंदिर व आता हनुमान गदेमुळे पेमगिरीच्या पर्यटन वैभवात मोठी भर पडणार आहे. निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेल्या पेमगिरीला गतवैभव मिळवून देण्यासाठी गावचे भूमिपुत्र असलेले पुण्यातील प्रतिथयश उद्योजक रोहित डुबे यांच्या प्रयत्नांतून व नवनवीन संकल्पनेतुन तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे रेखाटले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ.सुधीर तांबे, अकोले विधानसभा मतदारसंघांचे आमदार डॉ. किरण लहामटे, नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, शिवव्याख्याते व लेखक प्रा.नामदेवराव जाधव, जय मल्हार मालिका प्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पेमगिरी व तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असं निमंत्रण समस्त ग्रामस्थ पेमगिरीकरांच्या वतीने देण्यात आले आहे.