अहिल्यानगर
नागरिकांच्या हस्ते राहुरी फॅक्टरी स्मशानभूमीचे लोकार्पण
देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथील डॉ तनपुरे साखर कारखाना हद्दीतील अंबिकानगर जवळ असलेल्या स्मशानभूमीचे आज स्थानिक तरुणांनी पुष्पहार अर्पण करून लोकार्पण केले आहे.
दि. ११ जानेवारी २०२१ रोजी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी या स्मशानभूमीची व्यथा त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह मांडली होती. त्यामध्ये धनंजय डोंगरे, विकास सातपुते सोमनाथ डुकरे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्या लाईव्ह मध्ये माणसाला शेवटचा क्षण तरी विसाव्याचा जावा हा उल्लेख करून त्या स्मशान भूमीचे वास्तव ढुस यांनी मांडले होते. आजही तो फेसबुक लाईव्ह नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तदनंतर दि. २० जानेवारी २१ रोजी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसलेे यांनी देवळाली प्रवरा नगरपालिकेला भेट देऊन माणसाला शेवटचा क्षण तरी विसाव्याचा जावा असे सांगून या स्मशानभूमीचा तात्काळ प्रस्ताव देण्यास सांगितले होते.
सदर स्मशानभूमी ही डॉ तनपुरे साखर कारखाना हद्दीत असल्याने येथील प्रशांत काळे, प्रसाद लोखंडे व अंबिका मित्रमंडळ आणि स्थानिक नागरिकांनी दि. २० सप्टेंबर २०१८ रोजी कारखान्याचे या स्मशानभूमीसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. ही स्मशानभूमी व्हावी म्हणून येथील स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली होती. शेवटी स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांना यश आल्याने ही स्मशानभूमी झाली असल्याने स्थानिक नागरिकांनी पुष्प अर्पण करून त्या स्मशानभूमीचे लोकार्पण केले.