गुन्हे वार्ता
गोरगरिबांच्या तांदळाला फुटलेत पाय, ५ लाखांचा तांदुळ राहुरी पोलिसांनी काळ्या बाजारात जाताना पकडला
राहुरी | बाळकृष्ण भोसले : सुमारे पाच लाख रुपये किमतीचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जात असताना राहुरी पोलिसांनी छापा टाकून सदर तांदूळ व एक ट्रक असा सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे. ही घटना सोमवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी घडलीय. हा गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल २४ तास अवधी लागला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये. यासाठी कोणते वरिष्ठ अधिकारी दबाव टाकत होते. याची तालूक्यात चर्चा सुरू आहे.
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान राहुरी पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली होती. त्यानूसार राहुरी पोलिस पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, पोलिस नाईक सचिन ताजणे, नदीम शेख, शशिकांत वाघमारे आदि पोलिस पथकाने राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा दरम्यान रोडवर सदर ट्रकचा पाठलाग करून पकडले. ट्रकमधील चालक व वाहकाकडे चौकशी केली असता ट्रकमध्ये रेशनचा तांदुळ असल्याची शंका आली. त्यावेळी पोलिस पथकाने ५ लाख ४ हजार रूपये किंमतींचा सुमारे २५ टन तांदूळ व ३० लाख रूपये किंमतीचा मालट्रक असा एकूण सुमारे ३५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आला.
याप्रकरणी पोलिस नाईक सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरुन देवळाली प्रवरा येथील सुनिल चांगदेव गल्हे, वय ४३ वर्षे, तसेच ट्रक चालक उध्दव अर्जुन खाडे, वय ४३ वर्षे, राहणार दरखवाडी, ता. जामखेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल २४ तासाचा अवधी पोलिसांना लागला. हा गुन्हा दाखल होऊ नये. यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात होता. ते वरीष्ठ अधिकारी कोण आहेत. याची चर्चा तालूक्यात सुरू आहे.