कृषी
हवामान संरक्षित पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांकरिता कार्यशाळा संपन्न
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्यावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत हवामान संरक्षित पाणलोट क्षेत्र विकास या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास (नाबार्ड) बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पुणे येथील महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. गोवर्धनसिंग रावत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी हवामान बदलामुळे कृषि क्षेत्रावर होणार्या परिणामांचा उल्लेख केला व त्यासाठी नाबार्ड अंतर्गत करता येणार्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी भूषविले.
या कार्यशाळेसाठी एकूण ५५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळे दरम्यान स्वयंसेवी संस्थेतील प्रशिक्षनार्थिनी भविष्यात राबविण्यात येणार्या हवामान संरक्षित पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांचे अहवाल सादर केले. त्यांना हवामान संरक्षित पाणलोट क्षेत्र विकास या विषयातील तज्ञ वैज्ञानिकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यशाळेचे संयोजक म्हणून प्रकल्प प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार व विभाग प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, सहसंयोजक म्हणून प्रकल्प सहप्रमुख डॉ. मुकुंद शिंदे व पुणे येथील नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक इंजि. सचिन कांबळे, आयोजन सचिव म्हणून प्राध्यापक डॉ. अतुल अत्रे यांनी काम पहिले. तसेच या तीन दिवसीय कार्यशाळेचे नियोजन डॉ. वैभव मालुंजकर, डॉ. स्नेहल कानडे व इंजि. मोहसीन तांबोळी यांनी केले.