छत्रपती संभाजीनगर
बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर; वैद्यकीय अधिकारी नसल्याने महीलेची वाटेतच प्रसुती
पैठण : तालुक्यातील बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. येथील केंद्रावर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे एका महीलेला बिडकीन येथे प्रसुतीसाठी घेऊन जात असताना वाटेतच प्रसुती झाल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे नागरिकांतुन संताप व्यक्त केला जात आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर शासन दर महीन्याकाठी लाखो रूपये खर्च येथील कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पगारावर करीत आहे. मात्र, हे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. सतत गैरहजर असतात. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना हे आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. खासगी रुग्णालयातील उपचार खिशाला परवडत नाही आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘राम’ राहिला नसल्याने रुग्णांची मोठी फरफट होत आहे. नुकतेच रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गावतांडा येथील रेश्मा शाहरुख शेख यांना प्रसुतीसाठी बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, यावेळी रात्री याठिकाणी दोन पैकी एकही वैद्यकीय अधिकारी कार्यरत नसल्यामुळे शेख यांना बिडकीनला प्रसुती करण्यासाठी जा असा सल्ला देण्यात आला.
रेश्मा शेख यांना त्यांचे नातेवाईक रुग्णवाहीकेव्दारे बिडकीनला प्रसुतीसाठी घेऊन जात असताना त्यांना वाटेतच प्रसुती वेदना सुरू झाल्या आणि त्यांची निलजगाव नजीक रूग्णवाहिकेत प्रसुती झाली. आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी असल्यामुळे रूग्णांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. बालानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आसपासच्या २५ गावांचे रूग्ण येतात. परंतु, बालानगरला जाण्यासाठी रस्तेही चांगले नाहीत. आरोग्य केंद्रात नवीन रूग्णवाहिका देण्यात आली असून अडचणीच्या वेळेस रूग्णांना खासगी वाहनांचाच सहारा घ्यावा लागतो.
एक वर्षापूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे शवविच्छेदन गृह बांधले. मात्र येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे, या ठिकाणी शवविच्छेदनासाठी रूम असतानाही बिडकिन किंवा पैठण येथेच जावे लागते. याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी असतानाही वेळेला कोणीच हजर राहत नसल्यामुळे रूग्णांची परवड होत आहे. रिक्त जागा भरण्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने रिक्त पदे भरूण सोयीसुविधा देण्याची मागणी बालानगर परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.