शिक्षणवारी ज्ञान पंढरी
शेर-ए-काश्मीर विद्यापीठातील कार्यशाळेत कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
राहुरी विद्यापीठ : जम्मू काश्मीर येथील शेर-ए-काश्मीर विद्यापीठात दि. 14 ते 28 जुलै, 2022 या दरम्यान नवी दिल्ली येथील विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाद्वारे अनुदानप्राप्त ॲक्सलरेट विज्ञान या योजनेतंर्गत शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने फळपिकांना लागण करणार्या वनस्पतींमधील रोग शोधण्यासाठी आण्विक तंत्राचा वापर या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत देशभरातून वनस्पती रोगशास्त्र, किटक शास्त्र व कृषि जैव तंत्रज्ञान या विषयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभागाच्या कु. मुक्ता जोशी, मुकुंद डवले व एस.व्ही. सहाना या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ व विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत आधुनिक आण्विक तंत्रज्ञान आणि थंड प्रदेशातील फळझाडांचे रोग, त्यांची ओळख व निदान करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान शिकविण्यात आले. यासाठी विविध तज्ञांचे मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
या कार्यशाळेत प्रयोगशाळेतील विविध उपकरणे, त्यांची हाताळणी आणि रोगाचे निदान करण्यासाठीच्या चाचण्या जसे की एलिसा, आर.टी.पी.सी.आर., जेल-इलेक्ट्रोफोरेसीस व त्यांचे विविध प्रकार, जनुक संश्लेषण, निदान करतेवेळी घ्यावयाची काळजी यासारख्या अनेक नविन तंत्रज्ञानाचे आजच्या काळातील महत्व व उपयोग यासारखे तंत्रज्ञान शिकविण्यात आले. महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त प्रयोगशाळा उपलब्ध असून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील संशोधनासाठी या कार्यशाळेचा उपयोग होणार आहे.