कृषी
मोसंबी पिकातील फळगळ नियंत्रण विषयी कृषि विभागाकडून मार्गदर्शन
वडीगोद्री : फलोत्पादन किड व रोग सर्वेक्षण प्रकल्प ( हॉर्टसप) अंतर्गत व सचिन गिरी तालुका कृषी अधिकारी,अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली मोसंबी पिकावरील शेतीशाळा युवा प्रगतशील शेतकरी सचिन चोरमले यांच्या मोसंबीच्या शेतात घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकरी बंधूना मोसंबी मधील फळगळ समस्या, कारणे आणि उपाययोजना विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषि सहाय्यक अशोक सव्वाशे म्हणाले की, सद्यस्थितीत आंबिया बहाराची फळे विकसनशील अवस्थेत आहेत. साधारणतः झाडाची निरोगी स्थितीत झाडातील संजीवकाचा शेवटच्या टोकापर्यंत होणारा पुरवठा, कर्ब नत्र यांची संतुलन, संतुलित पोषण यामुळे फळे परिपक्व होण्यापर्यंत मदत होते. मात्र बदलते हवामान, सततचे ढगाळ हवामान, किमान आणि कमाल तापमानात फरक झाल्यास, जास्त आर्द्रता, कर्ब नत्र यांचे असंतुलन, अपुरे पोषण, पाण्याचा अभाव, पावसाचा खंड तसेच कीड व रोग इत्यादी कारणांमुळे फळगळ संभवते. त्या करिता एन ए ए १ ग्रॅम (१० पि पि एम) किंवा जिब्रेलिक एसिड १.५ ग्रम ( १५ पि पि एम) अधिक युरिया (१० किलो) प्रति १०० लिटर याप्रमाणे फवारणी करावी.
यावेळी कृषी सहाय्यक गोवर्धन उंडे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा. रात्री बागेत १०० वॅटचे बल्ब अधून मधून लावावेत. याखाली केरोसिन किंवा कीटकनाशकयुक्त पाणी असलेले पसरट भांडे ठेवावे. पतंग प्रकाश झोताकडे आकर्षित होऊन धडक देतात आणि भांड्यातील पाण्यात पडतात. पतंगाला आकर्षित करून मारण्यासाठी विषारी आमिषांचा सुध्दा वापर करता येईल. त्यासाठी १ लिटर पाण्यात १० मि.लि. मॅलॅथिऑन मिसळून आमिषाचे द्रावण तयार करावे. साधारणत: २५० मि.लि. द्रावण मोठे तोंड असलेल्या डब्यात टाकून ते झाडावर टांगावेत. यासाठी रिकाम्या झालेल्या कीटकनाशकांच्या डब्यांचा वापर करता येईल. या पतंगाच्या अळ्या गुळवेल, वासनवेल किंवा तत्सम तणांवर उपजीविका करीत असल्यामुळे परिसरातील या तणांचा नायनाट करावा. खाली पडलेली फळे नियमित वेचून खड्ड्यात पुरून टाकावीत. रात्री ७.०० वाजताच्या दरम्यान ओलसर कचरा जाळून बागेत धूर करावा. मॅन्कोझेब अधिक मेटालेक्झील हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. या उपाययोजनांचा एकात्मीक पद्धतीने अवलंब केल्यास रस शोषण करणाऱ्या पतंगामुळे होणारी फळांची गळ काही प्रमाणात कमी करता येईल. मोसंबीवरील शेतीशाळेचे आयोजन कृषी सहाय्यक विजय जाधव यांनी केले. तर कृषी सहाय्यक लहू क्षिरसागर यांनी उपस्थित शेतकरी बंधु यांचे आभार मानले. शेतीशाळेला कृषी सहाय्यक अंकुश जुमडे, लहू क्षिरसागर, कृषी मित्र गणेश फिसके, ज्ञानेश्वर म्हस्के, संदीप खापरे, मानसिंग पवार, अर्जुन घोलप, अशोक भद्रे, गंगाधर घोंगडे, भास्कर मिरकड आणि परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.