कृषी
मोसंबीला गळती लागल्याने शेतकरी राजा संकटात; कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळेना
विलास लाटे | पैठण : तालुक्यासह ढोरकीन, बालानगर परिसरात आंब्या बहार मोसंबी फळाला गळती लागून झाडाखाली सडा पडत आहे. यामुळे आता मोसंबी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सततचा पाऊस, रोगराई, नैसर्गिक आपत्तीमुळे फळगळतीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने मोसंबीच्या झाडाखाली फळांचा सडा पडत आहे. यामुळे फळबाग उत्पादक शेतक-यांनाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
मात्र गेल्या काही दिवसापासून आलेल्या पावसामुळे मोसंबीला गळती लागली आणि शेकडो टन मोसंबी गळल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ही फळ गळती कोणत्या रोगामुळे होत आहे, ती का होत आहे याबद्दल शेतकऱ्यांना कोणतीच माहिती नाही. दुर्दैव म्हणजे अद्याप पर्यंत कृषी विभागाने ही त्याकडे लक्ष घातलेले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.
फळबागा विक्रीला आलेल्या आहे. मात्र पाऊस सुरुच आहे. फळबागा तोडताना व वाहतुकीची कोंडी होत असल्याने मोसंबीची फळे झाडाला तशीच लटकून आहेत. बाजारात मोसंबीच्या भावात आता मोठ्या संख्येने घट झाली आहे. यामुळे फळबाग उत्पादकांच्या निराशा दिसून येत आहे. कृषी विभागाने मोसंबी उत्पादकांना मार्गदर्शन करण्याची मागणी जोर धरत आहे.
फळबाग उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी मोसंबी उत्पादक करत आहेत. मोसंबीला बाजारात अकरा हजार ते बारा हजार रुपयांपर्यंत टनाला भाव मिळत आहे. आणखी शेतकरी संकटात सापडला आहे. मोसंबीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.