अहिल्यानगर
पवित्र मरिया सर्वांसाठी विश्वासाचा श्रद्धेचा आदर्श- रिचर्ड डिसीलव्हा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव येथील मतमाउली यात्रापूर्व सहावा शनिवार नोव्हेना भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्यावेळी मिस्सा अर्पण संत अन्ना चर्च धर्मगुरू ब्रिस्टन बिरो यांनी अर्पण केला व पवित्र मारीयेच्या जीवनाविषयी डॉन बॉस्को धर्मगुरू रिचर्ड डिसिल्व्हा यांनी प्रवचन केले.
त्यांनी सांगितले की आज तीन चर्चचे धर्मगुरू व भाविक प.मरीयेच्या चरणी आज येथे जमलो आहोत. तिचा सन्मान करण्यासाठी व मध्यस्थी करण्यासाठी जमलो आहोत, प.मरिया आम्हा सर्वांसाठी विश्वासाचा व श्रद्धेचा आदर्श आहे. या जगात जीवन जगत असताना विश्वास ठेवणे फार अवघड असते. तरी विश्वास व श्रद्धेशिवाय जगू शकत नाही त्यासाठी प.मरिया व देवावरती विश्वास ठेवून जगणे फार महत्वाचे आहे. तिच्या जीवनात अनेक संकटे आली दु:ख आले तरी सदैव परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगत राहिली. त्याचप्रमाणे आमच्या जीवनात देखील अनेक अडचणी, संकटे येतात. अशा वेळी देवावर विश्वास ठेवून जगायला पाहिजे. तेंव्हा जीवनात परमेश्वर अनेक चमत्कार घडवितो. आज तिच्या चरणी प्रार्थना करतो पवित्र मरीयेचा आदर्श जीवनात उतरवून देवावर विश्वास ठेवून आम्ही ख्रिस्ती जीवन जगावे.
या नोव्हेना प्रसंगी हरिगाव प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, मुख्याध्यापक जेम्स तुस्कानो, संत जॉन चर्च भिंगार धर्मगुरू विश्वास परेरा आदी सहभागी झाले होते. प्रारंभी पवित्र मरिया मूर्तीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, सिस्टर्स, भाविक, महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येत्या शनिवारी दि १३ ऑगस्ट रोजी ख्रिस्त सभेच्या सहवासात नित्य सहाय्य करणारी मत या विषयावर ख्रिस्त राजा चर्च घोडेगाव येथील धर्मगुरू प्रवचन करणार आहेत. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत तेरेजा चर्च प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे व सहकारी धर्मगुरू, व धर्मभगिनी, हरिगाव, उन्दिरगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.