ठळक बातम्या

पेन्शनवाढीचा प्रश्न निश्चित सुटण्याच्या मार्गावर – कमांडर अशोकराव राऊत

संगमनेर : EPS-95 पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीचा प्रश्न निश्चित सुटण्याच्या मार्गावर असून, केंद्र सरकारकडून भरीव तरतूद करण्याचे स्पष्ट आश्वासन मिळाले आहे, अशी माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी संगमनेर येथे झालेल्या मेळाव्यात दिली.

EPS-95 पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीसाठी वेळोवेळी केंद्रीय मंत्री, भविष्य निर्वाह निधी मुख्यालय यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन वेळा भेट घेऊन या विषयावर पाठपुरावा करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कामगार मंत्री मनसुख मांडवीया यांनीही पेन्शनवाढीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे.

मेळाव्यात बोलताना कमांडर राऊत म्हणाले, “अर्थसंकल्पात ११,२५० कोटी रुपयांची तरतूद कामगार मंत्रालयासाठी आहे. याचा तपशील लवकरच मिळवण्यात येईल. या संदर्भात राष्ट्रीय सचिव वीरेंद्रसिंह राजावत दिल्ली येथे पाठपुरावा करत आहेत. जर अपेक्षित तरतूद झाली नाही, तर आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.” असे सांगितले.

EPS-95 पेन्शनधारकांच्या हक्काच्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू असून, लवकरच पेन्शनवाढ निश्चित होईल, असा विश्वास कमांडर अशोकराव राऊत यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय संघर्ष समिती व EPS-95 वेलफेअर असोसिएशन अहिल्यानगर यांच्या वतीने संगमनेर येथे मेहेर विद्यालयाच्या जाणता राजा मैदानाशेजारी पेन्शनधारकांचा मेळावा पार पडला. या वेळी पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. माजी आमदार सुधीर तांबे यांनीही पेन्शनर्सच्या प्रश्नांवर सतत पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.

या मेळाव्याला माजी आमदार सुधीर तांबे, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, उषा राऊत, छत्तीसगडचे इजाज उल रहमान, महिला आघाडीच्या अध्यक्ष सरिताताई नारखेडे, आशाताई शिंदे, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, सुभाष पोखरकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग जाधव आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून मोठ्या संख्येने पेन्शनर्स उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button