अहिल्यानगर
श्रीरामपूर तालुका सीड्स, पेस्टीसाईड व फ. असोसिएशनच्या वतीने खत कंपनी विरोधात लाक्षणिक बंद
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर तालुका खते, सीड्स व पेस्टीसाईड डीलर्स असोसिएशन श्रीरामपूर यांच्या वतीने दिनांक २७ व २८ ओगस्ट रोजी श्रीरामपूर तालुक्यातील सर्व कृषी विक्रेते यांनी आपली कृषी सेवा केंद्रे बंद ठेवून रासायनिक खत कंपन्यांचे लिंकिंग धोरण विरोधात दोन दिवस लाक्षणिक बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती असो. अध्यक्ष राहुल उंडे यांनी दिली. तसे निवेदन कृषी संचालक म.राज्य पुणे, तहसीलदार श्रीरामपूर, कृषी अधीक्षक अहमदनगर, कृषी विकास अधिकारी पं.स. श्रीरामपूर यांना दिली आहेत.
सध्या रासायनिक खताच्या सर्व कंपन्या प्रत्येक ग्रेड सोबत काहीना काही लिंकिंग करीत असून सध्या खरिफ व रब्बी हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या खतांसोबत गरज नसलेल्या अनावश्यक खते, औषधे व वस्तू शेतकऱ्यांना विकण्याची सक्ती कृषी केंद्र चालकांना केली जात आहे आणि जर कोणी अनावश्यक औषधे खते घेत नसतील तर त्या विक्रेत्यास आवश्यक असलेल्या रासायनिक खतांचा पुरवठा केला जात नाही. त्यासोबत आवश्यक असलेल्या खतांचे वाहतूक भाडेही विक्रेता बंधूकडून वसूल केले जात असल्याने येणारी रासायनिक खते एमआरपीच्या पुढे विक्रेत्यांचे दुकानात येऊन पडत आहेत आणि सोबत लिंकिंग येत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना गरज असलेल्या खतांची निर्धारित किमतीमध्ये विक्री करणे कृषी केंद्र चालकास खूप कठीण होत असून शेतकऱ्यांचे रोषाला सामोरे जावे लागत आहे.
तरी शासकीय कृषी संचालक कृषी अधिकारी यांनी कंपनीच्या या जाचक लिंकिंग धोरण विरोधात लक्ष घालून आवश्यक असणारी सर्व रासायनिक खते विक्रेत्यांना बिना लिंकिंग पोहोच होतील. यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी व या जाचातून मुक्तता व्हावी अशी मागणी असोसिएशनने केली आहे. तरी या दोन दिवशी तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी आपली दुकाने बंद ठेवून लाक्षणिक बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.