छत्रपती संभाजीनगर

गोरधर्म व गोरबोली मान्यतेसाठी समाजाने एकत्र यावे- डाॅ कृष्णा राठोड


◾गोर बंजारा धर्मपीठ पोहरादेवीला होणार धर्मपरिषद

   विलास लाटे/पैठण : गोर बंजारा धर्म पीठ, पोहरागड येथे येणाऱ्या दि.२१ व २२ नोव्हेंबरला धर्म परिषद व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी ) येथील गोरबंजारा धर्मपीठ, संत सेवालाल महाराज पुण्यभुमि पोहरादेवी येथे देशभरातून हजारो साधूसंत महंत व भक्त गण व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने गोरधर्म व गोरबोली मान्यतेसाठी समाजाने एकत्र यावे असे आवाहन गोरधर्म प्रसारक डॉ कृष्णा राठोड यांनी केले आहे.

या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून धर्मपीठ तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भव्य गोरधर्मपरिषद भरणार आहे. यावेळी गोरधर्मपीठाधीश्वर प. पू. बाबुसिंग महाराज, गोपाल चैतन्य बाबाजी, सिद्धलिंग स्वामी, प्रेमसिंग महाराज, बळीराम महाराज, दुर्गादास महाराज, कबीरदास महाराज, जुगनू महाराज, भोजू महाराज, गोपाळ महाराज, धनु महाराज, रायसिंग महाराज, हरी शरणानंद महाराज, विशुधानंद महाराज मथुरा, लक्ष्मण महाराज अथणी, पंकजपाल महाराज, दादाराव महाराज, यशवंत महाराज, परशुराम महाराज, सुनिल महाराज, जनार्दन महाराज, सेना महाराज, अमरसिंग महाराज सह अनेक धर्मगुरुंचा समाजाला आशिर्वाद व मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी बंजारा धर्म व सांस्कृतिक परिषद होणार असून देशभरातील बंजारा प्रतिनिधि, साधूसंत, साहित्यिक, कवी, भजनी, गितकार, प्रबोधनकार यांची उपस्थिती राहणार आहे.

गोर बंजारा समाजाच्या विकासासाठी सर्व धर्मसंस्था प्रमुखांची उपस्थिती राहणार असून सर्व मंदिर संस्थान प्रमुख व साधूसंत यांच्या उपस्थिती मध्ये धर्मसत्ता माध्यमातून गोरबंजारा समाजाचा विकास या विषयावर चिंतन व मंथन होणार आहे. संपूर्ण बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज व पांढरा झेंडा हे समाजाच्या अग्रभागी असणार असून यावेळी साधूसंताच्या हस्ते गोरधर्म ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरूवात होईल.

धर्मपरिषदेतून धर्मसत्ता-राजसत्ता-साहित्यसत्ता यावर चर्चा असून समाज विकासासाठी शिक्षण महत्वाचे हा संदेश दिला जाणार आहे. १० कोटी बंजारा समाजाला दिशा देण्याचे काम धर्मसत्तेच्या माध्यमातून केले जाईल व बंजारा गोरबोलीला व आपल्या स्वतंत्र चालीरीती रूढी पंरपरा असणाऱ्या गोर धर्माला मान्यता मिळवणे हा मुख्य अजेंडा या धर्मपरिषदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. यामुळे भविष्यामध्ये गोरधर्म व गोरबोली साठी संपूर्ण समाज धर्मसत्तेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरेल व आपल्या न्याय हक्कासाठी समाजाला एकत्र आणण्यासाठी धर्मपरिषद महत्वाची भूमिका बजावेल.

देशामध्ये पहिल्यांदाच गोरधर्म परिषद होत असून या धर्मपरिषदेकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. कार्यक्रमाअंर्तगत विविध जबाबदाऱ्या स्वयंसेवेसाठी, तसेच कार्यक्रम सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बांधवानी, विचारवंत नेते, कार्यकर्ते, मागदर्शक सल्लागार यांनी संपर्क साधावा, असे आवाहन गोरधर्मपीठावरून करण्यात आले आहे.

याच बरोबर सदरील परिषदेसाठी औरंगाबाद परिसरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे गोर धर्म प्रसारक डाॅ. कृष्णा राठोड, सामाजिक कार्यकर्ते अविनाश भाऊ जाधव, पी डी राठोड, विकास अंबरवाडीकर, एकनाथ चव्हाण, करतार राठोड, शांतीलाल राठोड, शिवचरण राठोड यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button