अभिजात मराठी भाषेची व्यावहारिक समृद्धता आणि ज्ञानभाषा गुणवत्ता वाढविली पाहिजे- डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) : मायमराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला, या भाषेची आणि मराठी माणसांची त्यामुळे प्रतिष्ठा वाढली असून आता अभिजात मराठी भाषेची व्यावहारिक समृद्धता आणि ज्ञानभाषा म्हणून तिची गुणवत्ता वाढविणे ही प्रत्येक मराठी भाषिकांची इतिकर्तव्यता असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहिःशाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय मराठी विभाग, देवळाली प्रवरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा २०२५ उपक्रमांतर्गत ‘मराठी भाषा: समृद्धता आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत डॉ. बाबुराव उपाध्ये हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्राचार्या सौ.स्वातीताई हापसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख संयोजक व मराठी विभाग प्रमुख प्रा. अविनाश मेहेत्रे यांनी करून दिली. याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रा. रागिणी टेकाळे- कदम, प्रा. संध्या साबळे, प्रा.नम्रता जाधव, प्रा.अनुजा करपे, प्रा. कावेरी बाचकर आदिंसह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी भाषा ही प्राचीनतम असून ती अनेक दृष्टीने गुणवत्ता संपन्न आणि ज्ञानसंपन्न आहे. महाराष्ट्राची ती अस्मिता आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी अभ्यासक, संशोधक, साहित्यिक, राज्य सरकार तसेच सूज्ञ वाचक यांनी अनेक वर्षापासून प्रयत्न केले. माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे भारतातील ४५० विद्यापीठात अध्यासन केंद्राद्वारे ही भाषा शिकविली जाणार आहे. स्कॉलरसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होणार आहेत. भाषा विकासासाठी केंद्राकडून भरीव असे आर्थिक अनुदान प्राप्त होणार आहे.
नव्या वर्षात मोदी केंद्रिय कॅबिनेट मंत्रिमंडळाने मराठी, पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा एकाच वेळी बहाल केला. त्यामुळे मराठी माणसांना नव्या वर्षाची ही मोठी भेट मिळाली आहे. या अगोदर तमिळ, संस्कृत,तेलगू, कन्नड मल्याळम या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता.
आता प्रत्येक मराठी भाषिकाने या भाषेचा दैनंदिन वापर आणि तिची गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले पाहिजेत. या दर्जामुळे अनेक बोलीचा अभ्यास, संशोधन आणि साहित्यसंग्रह करणे सुलभ होणार आहे, त्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे असे अनेक संदर्भविचार डॉ. उपाध्ये यांनी मांडले. त्यांनी विविध कवितेतून ग्रंथनिर्मिती आणि वाचनसंस्कृती विचार व्यक्त करून सर्वांना पुस्तके भेट दिली. सूत्रसंचालन प्रा.कावेरी बाचकर यांनी केले तर प्रा. अनुजा करपे यांनी आभार मानले.