कृषी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे खरीप चारापिके दिनाचे आयोजन
दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी शेतकर्यांनी स्वतःचा चारा स्वतः तयार करावा – कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजु अमोलीक
राहुरी विद्यापीठ : सध्या देशामध्ये अनुक्रमे 11 ते 23 टक्के हिरव्या व वाळलेल्या चार्याचा तुटवडा आहे. चारा पिकांची लागवड करतांना राहुरी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध चारा पिकांच्या वाणांची लागवड केल्यास हिरव्या चार्याचे प्रमाण वाढू शकेल. शेतकरी बांधवांनी वर्षभर चारा निर्मितीचे नियोजन करावे. त्यामुळे दुग्ध व्यावसाय फायदेशीर होईल असे प्रतिपादन कृषि वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजु अमोलीक यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन व उपयोगीता प्रकल्पाच्या वतीने खरीप चारापिके दिवस आयोजीत करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन डॉ. अमोलीक बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर चारा पैदासकार डॉ. जी.एन. देवरे, दुग्धशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप देवकर, जीवरसायन शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी दमामे व माजी चारा पैदासकार डॉ. प्रसन्न सुराणा उपस्थित होते.
डॉ. अमोलीक पुढे म्हणाले की चारा पिकांची कापणी 50 टक्के पीक फुलोर्यात असतांना करुन तो वाळवुन ठेवल्यास पावसाळ्यात उपयोग होईल असे नियोजन करावे. चारा पिकांचमध्ये रासायनीक किटकनाशकांचा वापर करण्यास बंदी असल्यामुळे कीड नियंत्रणासाठी जैविक किडनाशकांचा वापर करावा. वर्षभर चारा निर्मितीचे नियोजन करतांना एक एकर क्षेत्रामध्ये बहुवार्षिक चारा पिकांचा समावेश करावा. यामध्ये 10 गुंठ्यांमध्ये संकरीत नेपीअर, 10 गुंठ्यांमध्ये लसून घास व 20 गुंठ्यांमध्ये इतर चारा पिके असे नियोजन केल्यास आपल्या जनावरांना आवश्यक असणारा चारा आपल्या शेतातच उपलब्ध करता यईल असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकरी बांधवांना केले.
यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. दिलीप देवकर यांनी अधिक दुग्धोत्पानासाठी जनावरांचे व्यवस्थापन, डॉ. संदिप लांडगे यांनी खरीप चारा पिकांचे कीड व्यवस्थापन, डॉ. प्रसन्न सुराणा यांनी पशुधनासाठी विविध खरीप चारापिके व डॉ. विजयकुमार शिंदे यांनी पशुधनासाठी गवत लागवड या विषयांवरी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. जी.एन. देवरे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. शिवाजी दमामे यांनी करतांना चारा पिकांच्या गुणवत्तेबद्दल माहिती दिली. यावेळी प्रक्षेत्र भेटीचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र वंजारे यांनी तर आभार डॉ. शहाजी नवले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी परिसरातील 150 पेक्षा जास्त शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.