कृषी
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमांतर्गत राहुरी कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ टाकळी काझी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर
राहुरी विद्यापीठ : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञ विविध तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देवून मार्गदर्शन करीत आहेत. मध्यवर्ती परिसरात असलेल्या जैव तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ. अनिल काळे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक चिमोटे, डॉ. अधिर आहेर व जीव रसायनशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीपकुमार कचरे, डॉ. भरत भालेराव या शास्त्रज्ञांच्या चमुने टाकळी काझी, ता.जि. अहमदनगर या गावात शेतकर्यांच्या शेतावर भेट देवून त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या.
यावेळी शास्त्रज्ञांनी विद्यापीठात चाललेले संशोधन व सोयाबीन, मुग व चारा पिके या पिकांचे नविन वाण या विषयी माहिती दिली. सदर शास्त्रज्ञांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक व आय.डी.बी.आय. बँकेत भेट देवून बँक मॅनेजर एम.बी. काटे (एडीसीसी) व एच.एम. उगले (आयडीबीआय) यांच्याशी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा केली. त्यानंतर पशु वैद्यकीय दवाखान्यात भेट देवून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.जे. आचार्य यांच्याशी लम्पी रोगाबद्दल चर्चा केली. यावेळी ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, कृषि सहाय्यक विकास पवार व शेतकरी उपस्थित होते.
अखिल भारतीय समन्वित औषधी-सुगंधी वनस्पती व पानवेल योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र गायकवाड, उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. शर्मिला शिंदे व किटकशास्त्रज्ञ डॉ. भारत पवार यांनी चासकमान ता.जि. अहमदनगर येथील शेतकऱ्यांच्या औषधी, सुगंधी व फळबागेस भेट देवून त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. यावेळी औषधी, सुगंधी पीक उत्पादनास हमीभाव व विक्रीसाठी कायमस्वरुपी जिल्हावार बाजारपेठा असाव्यात अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कृषि विद्यापीठाचे संशोधन, शिफारशी व औषधी, सुगंधी वनस्पतींची रोपे उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याचबरोबर टोमॅटो सुधार प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. अनिकेत चंदनशिवे व तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी राहुरी तालुक्यातील मुळा धरणामुळे राहुरी तालुक्याच्या मुळ प्रवाहापासून तुटलेल्या व दुर्गम, डोंगळाळ भाग तसेच कोरडवाहू व आदिवासी क्षेत्र असणार्या जांभळी व जांभुळबन या गांवांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाच्या दैनंदिन तंत्रज्ञानाबाबत येणार्या अडचणींवर विद्यापीठाने प्रसारीत केलेले नविन वाण, लागवड तंत्रज्ञान व एकात्मिक किड व्यवस्थापन यावर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
महेंद्र ठोकळे यांनी कृषि विभागातील विविध योजना, ई-पीक पाहणी आणि पी.एम. किसान ई-केवायसी करणे, एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी टोमॅटो सुधार प्रकल्पाचे कृषि सहाय्यक भुषण हंडाळ, वावरथ गावाचे कृषि सहाय्यक प्रदिप जाधव व जांभळीचे कृषि सहाय्यक विनय भाकरे उपस्थित होते. वरील सर्व गावांमध्ये माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत झालेल्या या विविध ठिकाणी भेटीसंदर्भात संबंधीत शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व समाधान व्यक्त केले.