अहिल्यानगर
काशिनाथ गोराणे यांना सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार घोषित
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचा पहिला कै. नामदेवराव विश्वनाथ सुकळे सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार घोषित करण्यात आला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.
विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ही मान्यताप्राप्त सेवाभावी संस्था असून ती 30 जानेवारी 2018 रोजी महात्मा गांधी पुण्यतिथी दिनी सुरु झाली. महात्मा गांधी यांचा आदर्श समोर ठेवून विविध सेवाभावी कार्य करीत आहे. कै. नामदेवराव सुकळे हे चंद्रपूर जिल्ह्यातून 1960 मध्ये श्रीरामपूर येथे आले. त्यांनी अशोक सहकारी साखर कारखाना येथे प्रामाणिकपणे सेवा केली. ते विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई.शेळके, समनव्यक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये, सदस्य सुदामराव औताडे, खजिनदार पुष्पाताई सुकळे आदिंच्या सहकार्याने कै. नामदेवराव सुकळे यांनी सामाजिक सेवाकार्यात मोठे योगदान केले, अशा सेवाभावी व्यक्तिमत्वाच्या नावाने काशिनाथ गोराणे यांना प्रतिष्ठानचा ‘सेवाभावी व्यक्तिमत्व पुरस्कार ‘ घोषित झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कै. नामदेवराव सुकळे यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनी सोमवार दि.12 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वा. शिरसगाव रेल्वे ओहर ब्रीजजवळ माऊली वृद्धाश्रमात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.