ठळक बातम्या
शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त शालाबाह्य कामांचा बोजा अधिक; आ. तनपुरेंनी व्यक्त केली खंत
राहुरी | बाळकृष्ण भोसले – शिक्षक हा राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे शिक्षकांच्या हातून होते. त्यातूनच विद्यार्थी घडतात आणि देश यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचतो परंतु आज शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त अनेक शालाबाह्य कामे करावी लागत असल्याची खंत राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे त्यांनी व्यक्त केली.
कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय राहुरी येथे आ. प्राजक्त तनपुरे हे शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आ. तनपुरे पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी आपण विधानसभेत शिक्षकांची बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशालेचे कौतुक करताना ते म्हणाले की राहुरी तालुक्यातील सर्वात जुनी शिक्षण संस्था म्हणून या प्रशालेचा नावलौकिक आहे. प्रशालेने आपली गुणवत्ता टिकून ठेवण्याचे काम केले आहे. शालेय जीवनात आपल्याला देखील या प्रशालेत शिकण्याची इच्छा होती. पण या प्रशालेत न शिकता आल्याची खंत देखील त्यांनी आपल्या मनोगतातून मांडली.
प्रशालेचे मुख्याध्यापक कैलास अनाप यांनी शिक्षकांना आपल्या मनोगतातून प्रेरणा दिली. आपली शालेय कामे आपण वेळेवर व प्रामाणिकपणे केली तर विद्यार्थी निश्चित सर्व गुण संपन्न होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राहुरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अनुप बिहाणी यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व गुलाब पुष्प आणि पेन देऊन सर्व शिक्षकांचा सत्कार केला. प्रा रवींद्र घनवट यांनी यावेळी म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांमध्ये प्राजक्त तनपुरे केवळ राहुरीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासासाठी प्रयत्नशील होते, कोरोना सारख्या महाभयंकर काळातही आपल्या योग्य नियोजनाने आणि कार्यतत्परतेने या रोगावर शासनाने नियंत्रण मिळवले. यात प्राजक्त तनपुरे यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास बाल विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मोरे गुलाब, उपमुख्याध्यापिका सौ. देशपांडे मंजिरी, पर्यवेक्षक पारस जैन व पवार रंगनाथ तसेच शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खैरनार योगेश यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. घनवट रवींद्र यांनी व्यक्त केले.