छत्रपती संभाजीनगर
शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी; महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विलास लाटे | पैठण : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना (दि. १२) रोजी पैठण तालुका दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पैठण शाखेच्या वतीने शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या जाचक अटीतून कायमची सुटका करणे व वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा हीच प्रथम नियुक्ती दिनांक म्हणून ग्राह्य धरणे अशा ३ प्रमूख मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. यावेळी ‘मुख्यालय’ या विषयाबाबत थोडक्यात चर्चाही घडून आली. यावेळी लवकरच शिक्षकांना यातून दिलासा मिळेल, अशी ठोस ग्वाही देखील मिळाली.
यावेळी तालुकाप्रमुख अमोलराजे एरंडे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख महेश लबडे, तालुका सरचिटणीस कैलास मिसाळ, कार्याध्यक्ष अमोलराज शेळके, प्रसिद्धीप्रमुख पांडुरंग गोर्डे, शिक्षक पतसंस्था संचालक शौकत पठाण, श्रीकांत गोर्डे, प्रवीण फटांगडे, लक्ष्मण गलांडे, श्रीकांत कराड, गजानन नेहाले, मनोहर नागरे, माणिक नल्लेवाड, अजिनाथ दहीफळे, युनूस शेख, ओंकार चव्हाण, अरुण खळदकर आदींची उपस्थिती होती.