राजकीय
आता रडायचं नाही लढायचं – आदित्य ठाकरे
विलास लाटे/ पैठण : शिवसेनेने दिलेला शब्द पाळला. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करुन दाखवले आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. जे चाळीस गद्दार झाले त्यांच्यासाठी शिवसेनेने काय कमी केले. ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. जे गद्दार गेले ते जाऊ द्या. त्यांच्यासाठी रडायचं नाही तर लढायचे असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.
शनिवारी (दि.२३) पैठण तालुक्यातील बिडकीन येथे शिवसंवाद यात्रेदरम्यान जनतेशी साधलेल्या संवादात ते बोलत होते. या संवाद यात्रेला तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठाकरे यांचे जंगी स्वागत केले. याप्रसंगी मा.खा. चंद्रकांत खैरे, आ.अंबादास दानवे, आ.उदयसिंह राजपूत, तालुका प्रमुख मनोज पेरे आदींसह आजी, माजी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, पुरस्थितीमुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. हे सगळं होत असताना आपल्या राज्यात दोनच लोकांचं मंत्रिमंडळ बसले आहे. हे बेकायदेशीर आहे. हे सरकार पण बेकायदेशीर आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे तुम्ही लिहून घ्या असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या लोकांना महाराष्ट्राची चिंता नाही. शिवसेनेत कुणी आमदार फुटतोय का, खासदार फुटतोय का ? नवीन कुणी येतंय का ? यासाठी त्यांची धडपड दिसून येते. गेल्या दहा वर्षांपासून मी राजकारणात सक्रिय आहे. मात्र असे घाणेरडे राजकारण मी कधी पाहिले नाही. ज्या चाळीस जणांनी शिवसेना, शिवसैनिकांसोबतच नाही तर त्याही पुढे जाऊन माणुसकी सोबत गद्दारी केली आहे. हे शिवसैनिक कधीच विसरणार नाही. शिवसंवाद यात्रेदरम्यान जिथे मी जात आहे तिथे जनतेचे आशिर्वाद आणि प्रेम हे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहत असल्याचे दिसत आहे. ज्या गद्दाराचा रस्ता चुकला आहे. त्यांचा पुढचा विधानभवनात जायचा रस्ता हा चुकणार म्हणजे चुकणारच असे भाकीतही आदित्य ठाकरे यांनी वर्तवले.
शिवसेना अध्यक्षावर एका आठवड्यात दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण वाढले. अशा परिस्थितीत ते कोणाला भेटू शकत नव्हते. अशा स्थितीत आपल्या आमदारांनी त्यांना धीर देण्याची, सांभाळण्याची गरज होती. त्याउलट त्यांनी फोडाफोडीचे राजकारण करत पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. हि बंडखोरी नाही, उठावही नाही तर स्वार्थासाठी केलेली गद्दारी आहे असा घणाघात त्यांनी केला. तुम्ही जो निर्णय घेतला आहे, मग आता आमदारकीचा राजीनामा द्या व निवडणुकीला सामोरे जा. मग जे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल, असे आव्हान ही आदीत्य ठाकरे यांनी नाव न घेता बंडखोर आमदारांना केले.
प्रारंभी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात भगवा फडकल्या शिवाय रहाणार नाही. शिवसेनेवर निष्ठा असलेले शिवसैनिक हे त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा विश्वास याप्रसंगी बोलताना तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी राखीताई परदेशी, युवासेना तालुका प्रमुख विकास गोर्डे, पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ, अशोक धर्मे, ज्ञानेश्वर इथापे, प्रकाश वातोळे, ठकुबाई कोथंबीरे, स्वाती माने, सरपंच वैद्य, चंद्रकांत बारे, अजय परळकर, सुदाम घुले, राजु कुलकर्णी, रावसाहेब हाडे, सुनिल धुत, किरण गुजर, अमोल वंजारे, दिपक राठोड, फिरोज सय्यद, अशोक काळे, रामेश्वर घोडके, अमोल कोथंबीरे, दत्ता गिधाने, मोजमभाई, मनोज मुंडलिक, मच्छिंद्र हाडे, शरद लघाने, शामद शेख, सोमनाथ जाधव यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान याप्रसंगी अख्तर पठाण, सलमान पठाण, बशीर पठाण यांनी जाहीर प्रवेश केला.