जयंत चौधरी यांची आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जिल्हा विकास समिती अध्यक्षपदी निवड
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड.जयंत चौधरी यांची अध्यात्मिक ज्ञान व शांततेचा संदेश लाखो – करोडो साधकांव्दारे जगाला देणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या ५ जिल्ह्याच्या जिल्हा विकास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आर्ट ऑफ लिव्हिंगचे अध्यात्मिक गुरूदेव श्री श्री श्री रविशंकर यांनी ॲड.जयंत चौधरी यांची नियुक्ती केली आहे. उत्तर विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व साधक शिबीरांचे आयोजन, सत्संग, तसेच झनकृती या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, गायन, वादन, अभिनय, संगीत या स्पर्धेचे आयोजन वेगवेगळ्या गटांमध्ये केले जाते.
नुकत्याच झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जवळपास २०० देशातील हजारो स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल निमगांवखैरी विद्यालयाची विद्यार्थिनी कु.ज्ञानेश्वरी अरूण गाणार हीने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकपात्री अभिनय या प्रकारात व्दितीय क्रमांक मिळवुन पुणे येथे गरूदेव श्री श्री श्री रविशंकर जी यांच्या शुभ हस्ते तिचा सन्मान केला आहे.
ॲड.जयंत चौधरी यांच्या नियुक्ती बद्दल संस्थेच्या चेअरमन पुष्पाताई आदिक, अध्यक्ष डॉ.बबनराव आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व साधक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.