ठळक बातम्या

काझरी संशोधन सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे यांची नेमणूक

माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे यांची जोधपूर, राजस्थान येथील भाकृअप – केंद्रीय कोरडवाहू विभागीय संशोधन संस्थेच्या काझरी संशोधन सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक
   
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण दत्तात्रय कोकाटे यांची जोधपूर,राजस्थान येथील भाकृअप–केंद्रीय कोरडवाहू विभागीय संशोधन संस्थेच्या (काझरी) संशोधन सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी त्यांची या संस्थेच्या संशोधन सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.
डॉ. किरण कोकाटे हे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी संचालक विस्तार शिक्षण असून त्याआधी पाच वर्ष ते नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेत विस्तार विभागाचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील उपमहासंचालक हे पद केंद्राच्या कृषि मंत्रालयातील अतिरिक्त सचिवाच्या समकक्ष असलेले हे पद भुषविणारे ते महाराष्ट्र राज्यातील पहिले अधिकारी ठरले आहे. राष्ट्रीय पातळीवर विविध समित्यांवर ते अध्यक्ष व सदस्य म्हणून काम बघत आहेत. सध्या ते पटना येथील भाकृअप–संशोधन संकुलावर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे तसेच देशात नवीन कृषि सेवा केंद्रांच्या स्थापनेसाठी स्थान निश्चितीकरण समितीवर अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहे. निक्राच्या तज्ञ सल्लागार समितीवर देखील ते सदस्य म्हणून ते आपले योगदान देत आहेत.
सन 2009 साली त्यांची उपमहासंचालक पदावर निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील ६३७ कृषि विज्ञान केंद्राचे नेतृत्व करुन त्या अंतर्गत असलेले दहा हजार प्रकल्प समन्वयक आणि विषय विशेषज्ञांद्वारे देशाच्या कृषि विस्ताराला नवी दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे विभागीय प्रकल्प संचालनालयाचे नामांतर कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्थेत (अटारी) झाले. तसेच देशात आठ वरुन अकरा कृषि तंत्र उपयोजन संशोधन संस्था (अटारी) निर्माण केल्या. त्यात आपल्या राज्यात पुणे येथे एक अटारी संस्था मंजुर झाली आहे. उपमहासंचालक असताना त्यांनी कृषि विज्ञान केंद्राद्वारे देशात कृषि संशोधन आणि विस्ताराचे बळकटीकरण केले आहे. त्यांच्या या दुरदृष्टी व प्रभावशाली कार्यपद्धतीमुळे त्यांना कृषि विज्ञान केंद्राचे शिल्पकार संबोधले जाते. तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम कार्यक्रमाचे त्यांना जनक मानले जाते.
याचप्रमाणे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा अट्रॅक्ट अँड रिटर्न युथ इन अग्रिकल्चर (आर्या) या प्रकल्पामध्ये त्यांचे मोठे योगदान लाभले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात संचालक, विस्तार शिक्षण या पदावर काम करताना त्यांनी विस्तार शिक्षणाला नवीन दिशा दिली आहे. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना केंद्रीय कोरडवाहू विभागीय संशोधन संस्थेच्या (काझरी) संशोधन सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

Related Articles

Back to top button