अहिल्यानगर

हिंदी भाषेमुळे तरुणाईला रोजगाराच्या संधी उपलब्ध – शर्मा; सात्रळ महाविद्यालयात हिंदी दिवस कार्यक्रम संपन्न

राहुरी | बाळकृष्ण भोसले – माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हिंदी भाषेने स्वतःला सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातील लोकही मोठ्या प्रमाणात हिंदी भाषेचा उपयोग करतात. हिंदी भाषेचे शब्द भंडार मोठे असून हिंदी भाषेच्या विकासामध्ये प्रादेशिक भाषाचा सिंहाचा वाटा आहे. भाषा कोणतीही असो त्या भाषेतून आपण आपला विकास साधला पाहिजे. भविष्यात विविध क्षेत्रात खूप नोकरींच्या संधी उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा क्षेत्रात असलेल्या संधीचा फायदा करुन घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. हिंदी भाषेची ओळख फक्त राजभाषा किंवा अभ्यासक्रमाची भाषा म्हणून नाही तर आज हिंदी भाषा ज्ञानभाषा व जागतिक रोजगाराची भाषा बनत आहे. असे प्रतिपादन सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, कोल्हार शाखेचे शाखाधिकारी नितिन शर्मा यांनी केले.
तालुक्यातील लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी दिवस कार्यक्रम प्रसंगी नितीन शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे होते. प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. भाऊसाहेब नवले यांनी केले. स्वागत व पाहुण्यांचा परिचय डॉ. अनंत केदारे यांनी करून दिला.
याप्रसंगी शर्मा म्हणाले, “कोणत्याही भाषेच्या बाबतीत संकुचित दृष्टीकोन त्या भाषेच्या विकासासाठी घातक ठरू शकतो. आज इंग्रजी भाषेचा विरोध करून चालणार नाही, ज्ञानभाषा म्हणून सध्या हिंदी भाषा कुठेही कमी पडत नाही. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे म्हणाले, “संघ लोकसेवा आयोग, बैंकिंग क्षेत्र, सरकारी कार्यालय, रेल्वे, शिक्षण, प्रकाशन व्यवसाय, वर्तमानपत्र, भाषांतर, जाहिरात, पत्रकारिता, गीतलेखन, स्क्रिप्ट लेखन, विविध धारावाहिक इत्यादी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. हिंदी भाषेतील करियरसाठी विद्यार्थ्यांनी त्या विषयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विद्यार्थ्यानी विविध भाषांचे ज्ञान आत्मसात केल्यास त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
हिंदी दिनानिमित्त काव्यवाचन, कहानी वाचन, निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंधलेखन स्पर्धेत सुनील दादासाहेब पारखे (प्रथम क्रमांक ), जितेंद्र शिवाजी डेरे, कु. मिसबा जैनुद्दीन शेख (द्वितीय क्रमांक), कु. कोमल सुरेश शिंदे, कु. प्रियंका काशिनाथ पवार (तृतीय क्रमांक), कु. हिना शब्बीर सय्यद (उत्तेजनार्थ), पदव्युत्तर गटात कु. निकिता बालासाहेब कोठुले, (प्रथम क्रमांक), कु. पूनम लक्ष्मण गागरे व कु. सुचित्रा गोकुळ शिंदे (द्वितीय क्रमांक), कु. गायत्री किशोर गागरे (तृतीय क्रमांक) तर कवितावाचन स्पर्धेत कु. शुभांगी गोकुल शिंदे (प्रथम क्रमांक), कु. मयूरी भानुदास सिनारे, कु. वैष्णवी सुनील नालकर (द्वितीय क्रमांक) कु. हिना शब्बीर सय्यद, कु. गायत्री विश्वनाथ गावडे (तृतीय क्रमांक) विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने “हिन्दी पुस्तकांचे प्रदर्शन” भरविण्यात आले होते.
यावेळी प्रतीक्षा गागरे, प्रीती शिरसाठ, गायत्री गाडवे इत्यादी विद्यार्थ्यानी भाषणे केली. याप्रसंगी उपप्रचार्य डॉ. जयश्री सिनगर, डॉ. दीपक घोलप, प्रा. नंदकुमार भंडारी, डॉ. गंगाराम वडीतके, डॉ. एकनाथ निर्मळ तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कु. वैष्णवी नालकर हीने मानले. कु. गायत्री गाडवे हीने सूत्रसंचालन केले.

Related Articles

Back to top button