शेतीमधील उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ : कृषि विभागाने विद्यापीठाने विकसीत केलेले नविन वाण, यंत्रे, मोबाईल ॲप्स्, तंत्रज्ञान परिणामकारकरित्या शेतकर्यांपर्यंत पोहोचवावे. विद्यापीठाचे बियाणे निर्मितीमध्ये मोठे योगदान आहे. पीक उत्पादनात अनावश्यक खर्च कमी करुन उत्पादन खर्च कसा कमी करता येईल यासाठी मोठी मोहिम हाती घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे रब्बी-उन्हाळी, 2023 विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठकीचे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि विभागाचे संचालक विस्तार व प्रशिक्षण श्री. दिलीप झेंडे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करतांना संचालक विस्तार व प्रशिक्षण डॉ. दिलीप झेंडे म्हणाले राष्ट्रीय अजेंडानुसार तूरीखालील क्षेत्र व त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी मोहीम हाती घ्यावी लागेल. शेतकर्यांचा शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी बियाणे, सेंद्रिय किटकनाशके, निविष्ठा कसे तयार करायचे यावर भर देणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकाची नासाडी होत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना शोधणे गरजेचे आहे. विद्यापीठ विकसीत सोयाबीन वाणाने महाराष्ट्रात व इतर राज्यामध्ये उत्पादनाची क्रांती केली आहे. यावेळी त्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांचा आढावा सादर केला. यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार यांनी सन 2022 मधील प्रसारीत वाणांचे व शिफारशींचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीसुगी रब्बी-2023 मासीकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी नाशिक विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ, पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवाडी आणि कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी त्यांच्या विभागाचा रब्बी अहवाल सादर केला.
यावेळी झालेल्या तांत्रिक सत्रात डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. सुरेश दोडके आणि डॉ. दिपक दुधाडे यांनी हरभरा, गहू, ज्वारी लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. भगवान देशमुख, सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले. याप्रसंगी कृषि विभागाचे अधिकारी, कृषि विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहयोगी संशोधन संचालक आणि शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थित होते.