पीक उत्पादनवाढीसाठी मधमाशीचे योगदान महत्त्वाचे – कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ : प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे पृथ्वीवरील मधमाशा जर नष्ट झाल्या तर त्यानंतर फक्त चार वर्षाच्या आत मानव जात नष्ट होईल. यावरून मधमाशी हा एक महत्त्वपूर्ण कीटक असून तिची उपयुक्तता मानवाच्या कल्याणासाठी किती आवश्यक आहे हे लक्षात येते. मधमाशीमुळे विविध पिकातील परागीभवनाचे काम सहजपणे घडून येते व पर्यायाने पीक उत्पादनात वाढ होते. यावरून आपल्या लक्षात येते की पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशीचे योगदान किती महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
विद्यापीठातील मधुमक्षिका उद्यानाचे उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, डॉ. आनंद सोळंके, डॉ. भगवान ढाकरे, डॉ. अण्णासाहेब नवले, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, कीटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम कदम, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, मधमाशी प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. रणजीत कडू हे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की मधमाशी पालनामुळे परागीभवनाबरोबरच अनेक उपयोगी पदार्थ आपल्याला मिळतात. फळबागेत मधमाशांमुळे 30 ते 40 टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ होते. अशा या बहुगुणी मधमाशीचे संगोपन व संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सतत कार्यरत राहण्याचा गुण मधमाशीकडून शिकण्यासारखा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. सी. एस. पाटील आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय मधमाशी मंडळाने या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य दिले आहे. या प्रकल्पांतर्गत तीन घटक राबविले जातात. यात प्रामुख्याने ग्रामीण युवक व युवतींना प्रशिक्षण, उच्च प्रतीच्या मधमाशी बीज केंद्रांचा विकास व मधुउद्यान विकसित करणे यांचा समावेश आहे.
डॉ. पाटील पुढे म्हणाले की मधमाशीमुळे केवळ पिकांच्या उत्पादनात वाढत होत नाही तर पिकांच्या पोषणमूल्यात ही वाढ होते. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांमार्फत मधमाशी संशोधनाचे प्रयोग राबविले जातात. आजपर्यंत या प्रकल्पांतर्गत विद्यापीठ कार्यक्षेत्रात एकूण 12 शास्त्रोक्त मधमाशी पालनावरील प्रशिक्षणे आयोजित करण्यात आलेली आहेत. यामध्ये एकूण 300 पेक्षा जास्त युवक शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शास्त्रज्ञ व विद्यार्थी उपस्थित होते.