कृषी

शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत हरभरा बिजोत्पादन तंत्रज्ञान विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत आणि कृषि विभागाच्या सहकार्याने आयोजीत हरभरा बिजोत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम राहुरी तालुक्यातील तांभेरे या ठिकाणी आयोजित केला गेला.
यावेळी प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, हरभरा रोग शास्त्रज्ञ डॉ. सुदर्शन लटके, सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. व्ही. एम. कुलकर्णी, मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकल्प समन्वयक डॉ.पंडित खर्डे यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकात शेतकरी प्रथम प्रकल्पाची उद्दिष्टे व उपलब्धी विषद केली.
हरभरा बिजोत्पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती देताना डॉ. नंदकुमार कुटे यांनी हरभरा बिजोत्पादनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी डॉ. कुटे यांनी सांगितले की शेतकर्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले विक्रम, फुले विक्रांत या वाणांचा वापर करावा. डॉ. लटके यांनी हरभरा पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन, कीटकनाशकांचा योग्य वापर याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. कुलकर्णी यांनी भारत सरकारच्या सीड हब या प्रकल्पाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी बिजोत्पादनाच्या महत्वाच्या तीन टप्प्यांची माहिती दिली. त्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी शेतकर्यांची पात्रता, ही योजना कशी राबवावी तसेच बीज उत्पादन कार्यक्रमाद्वारे शेतकर्यांना उत्पन्नाचा मोबदला कसा मिळेल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी चिंचविहिरे व कनगर गावच्या शेतकर्यांनी शेतकरी प्रथम प्रकल्पाबद्दलचे आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले. प्रकल्प सहाय्यक किरण मगर यांनी आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कानडगाव, तांभेरे, चिंचविहिरे व कनगर या गावातील शेतकरी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रकल्प सहाय्यक राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button