प्रस्तावीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूरलाच व्हावे – आदिक
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव १९८०-८१ पासून शासनाच्या विचाराधीन असून अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी या तालुक्यासाठी स्वतंत्र जिल्हा मुख्यालय श्रीरामपूर योग्य असून तशी शिफारस मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीनेही अहवालात केली आहे. श्रीरामपूर येथे आरटीओ परिवहन कार्यालय, जिल्हा न्यायालय, अप्पर पोलीस अधीक्षक, विभागीय एसटी कार्यशाळा, शहरातच रेल्वे स्टेशन, भारत सरकारचे जिल्हास्तरीय पोस्ट कार्यालय, दूरसंचार कार्यालय, पासपोर्ट कार्यालय अशी सर्वात महत्वाची कार्यालये येथे असल्याने प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथेच व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून तसे निवेदन श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी अनिल पवार यांना असंख्य नागरिकांसमवेत देण्यात आले.
याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविणार असल्याचे आश्वासन प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिले. व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व तहसीलदार श्रीरामपूर यांना देण्यात आले आहे. श्रीरामपूर शहराच्या दुसऱ्या आराखड्यात भविष्यातील श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय डोळ्यासमोर ठेवून रचना व जागांचे आरक्षण करण्यात आले आहे. अ.भू क्र ४५२ त ४५५ अ मध्ये सरकारी कार्यालये, व निवास स्थानासाठी ७.७७ हेक्टर जमीन आरक्षित ठेवण्यात आली आहे. या आरक्षणामुळे भविष्यात श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय झाल्यास सरकारी कार्यालये व कर्मचारी निवासस्थानासाठी इमारती बांधण्यास ऐनवेळी जागेची शोधाशोध करावी लागणार नाही ही आधीच व्यवस्था ८०-८१ पासून शासन प्रस्तावात केली आहे.
निवेदनांवर माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अजय डाकले, सुनील थोरात, गणेश ठाणगे, शेतकरी संघटना सुरेश ताके, जिल्हा सरचिटणीस जयश्री जगताप, सौ अर्चना पानसरे, विजयराव खाजेकर, जितेंद्र भोसले, किशोर पाटील, देवा कोकणे, हरिभाऊ रेवाळे, गणेश आदिक, विधिज्ञ मुकुंद गवारे, नितीन गवारे, बाळासाहेब गवारे, बाळासाहेब बडाख, ए ए पटेल, निरंजन भोसले, तुषार आदिक, भाऊसाहेब वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र सरकारने सर्व बाबींचा विचार करून त्वरित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे व्हावे त्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी योग्य ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने अविनाश आदिक यांनी केली आहे.