अहिल्यानगर

पेमगिरीत महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात पर्यावरण व पर्यटन मेळावा संपन्न

संगमनेर | बाळासाहेब भोर : ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या व नैसर्गिक वारसा लाभलेल्या स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीत आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचा पर्यावरण व पर्यटन विषयक जनजागृती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्याच बरोबर रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सवाचाही कार्यक्रम टाळ मृदूंग भजनाच्या साथीने पार पडला.

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था ही महाराष्ट्रासह भारतात व भारताबाहेरील देशातही पर्यावरण समतोल राखण्यासाठी व त्याबाबत जनजागृती करण्यासाठी महत्वपूर्ण काम करत आहे. पेमगिरीतील विशाल महावटवृक्षाच्या सानिध्यात हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा तसेच पर्यावरण विषयक विविध स्पर्धेत सहभागी व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या नंतर सर्वांनी या महावटवृक्षाच्या सानिध्यात ग्रामीण भागातील प्रसिद्ध भोजन असलेलं पिठलं भाकरीचाही आस्वाद घेतला. पेमगिरीतील वाल्मिक कोल्हे, भीमाशंकर पांढरे, उमेश बैचे, विक्रम डुबे या विविध क्षेत्रातील विशेष व्यक्तींचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे, संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ.सुहासिनी भामरे, मानवाधिकार न्यायिक महासंघाच्या डॉ.रागिणी चवरे, वनविभाग अधिकारी, पर्यावरण मित्र व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाल्मिक कोल्हे व सूत्रसंचालन प्रा.सोमनाथ नाडे यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button