अहिल्यानगर
नगर-मनमाड महामार्गालगत खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
राहुरी / बाळकृष्ण भोसले : नगर-मनमाड राज्य महामार्गाचे सध्या नुतनीकरण सुरू असून ठिकठिकाणी पुलासाठी तसेच रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात वाहने कोसळून अपघात घडत आहेत. सोमवारी राहुरी कारखाना ते कोल्हार दरम्यान वेगवेगळ्या अपघातात तीनजण जखमी झाले असून एकजण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होणार असून रस्ता रुंदीकरण, बरोबर ठिकठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा खड्डे खोदाई केली गेली आहे. रुंदीकरणासाठी साईड पट्ट्यांची खोदाई तर सोबतच पेट्रोलियम कंपनीच्या गँस पाईप लाईनसाठी खोदाई केली गेली आहे. त्यासाठी १० ते १५ फुटाचे चर खोदले आहेत.
या खोदाईलगत काही ठिकाणी सुचना फलक लावले आहेत तर काही ठिकाणी लावलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दरम्यान सोमवारी सकाळी ११ वाजण्याचे सुमारास कोल्हारहून राहुरीकडे दुचाकीवर चाललेल्या युवकापुढे गुहा पाटापुढे रस्ते कंपनीचा एक डंपर जात होता. मागे असलेल्या युवकाने त्याची दुचाकी साईडपट्टी घेतली. मात्र समोर असलेल्या पुलासाठी घेतलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने साधारण वीसफुट खोल खड्ड्यात दुचाकीसह कोसळला. या अपघातात या युवकाचे दोन्ही पाय निकामी झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
स्थानिक तरुणांच्या मदतीने या युवकाला बाहेर काढत रुग्ण वाहिकेतून दवाखान्यात हलविण्यात आले आहे तर सुतगिरणीसमोर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन पतीपत्नी कोल्हारच्या दिशेने येत असताना त्यांची दुचाकी रस्त्याच्या कपारीवरुन घसरुन झालेल्या अपघातात दोघेही जखमी झाले तर याच ठिकाणी खड्डे चुकविण्याच्या नादात मागची दुचाकी समोर जात असलेल्या दुचाकीवर आदळली त्यात दोघेही दुचाकी स्वार जखमी झाले.
या महामार्गाचे नुतनीकरण होत आहे. परंतु संबंधित रस्ते बांधणी ठेकेदार व पेट्रोलियम कंपन्यांचे ठेकेदार यांनी योग्य काळजी न घेतल्याने नाहक प्रवाशांचे बळी जात आहेत. या ठेकेदारांवरच मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांमधून होत आहे.